मुंबई : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, इंडिया येथे एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात भाजपचे वांद्रे पश्चिम येथील आमदार अॅड. आशिष शेलार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य कार्यकारी सभासद रुपेश सावरकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. मान्यवरांनी असोसिएशन मधील दृष्टिहीन व्यक्तींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली. दृष्टिहीन व्यक्तींपैकी बरेच जण लेखक आणि कवी होते ज्यांनी केवळ स्पर्शाच्या आधारावर वाचन केले आणि त्यांपैकी बऱ्याच जणांना सन्मानित सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाबाबत बोलताना रुपेश सावरकर म्हणाले, "दृष्टिहीन लोकांना केवळ स्पर्शाच्या आधारावर पुस्तक वाचताना पाहून आश्चर्य वाटलं. भारतीय जनता युवा मोर्चाचा राज्य कार्यकारी सभासद ह्या नात्याने ह्या व्यक्तींसाठी जे काही करता येईल ते करणे हे मी माझे कर्तव्य मानतो. अशा प्रतिभावान व्यक्तींना त्यांची कला आणि कौशल्य दाखवून देण्यासाठी योग्य मंच उपलब्ध करून देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. जेणेकरून त्यांच्या भविष्यास हातभार लागेल." सावरकर फाऊंडेशनच्या मार्फत अनेक उपक्रम राबवण्याची रुपेश सावरकरांची इच्छा आहे.
ह्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारतभर करण्यात आले. दसऱ्याच्या निमित्ताने असोसिएशन फॉर द ब्लाइंड, इंडियाच्या आवारात पूजा आणि त्यानंतर श्री रामचरितमानसचे अखंड रामायण पाठचे कथन आयोजित करण्यात आले होते. दृष्टिहीन भक्त हे कथन सलग 24 तास करणार आहेत. अॅड. आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर ह्याबद्दल पोस्ट केले. कार्यक्रमास असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडियाचे अध्यक्ष हेमंत टकले उपस्थित होते.
भारतातील आर्थिकदृष्ट्या वंचित आणि गरीब समुदायांमध्ये डोळ्यांचे आजार अधिक प्रमाणात आहेत या वस्तुस्थितीचा विचार करून, मुंबईत सुरू केलेल्या नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड विभागाने, काचबिंदू, मोतीबिंदू आणि नेत्रश्लेष्मलाशोथ (डोळे येणे) या आजारांची तपासणी आणि त्यावर उपचार करण्याचे प्रकल्प अमलात आणले. त्याचबरोबर झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांना तसेच इतर वंचित प्रौढांना औषध आणि चष्मा उपलब्ध करून दिले. एनबीए मधील प्रशिक्षित कर्मचारी अत्याधुनिक नेत्र उपकरणांसह लक्ष्य गटांची नेत्र तपासणी करतात. एखादी केस गुंतागुंतीची असल्यास ती शस्त्रक्रिया तसेच योग्य उपचारांसाठी नेत्रतज्ज्ञांकडे पाठवली जाते. ही सेवा विनामूल्य आहे आणि नेत्ररोग तज्ञ, रुग्णालये आणि मुंबई महानगरपालिकेच्या विस्तृत नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत विभागाने 5,04,577 मुले आणि 1,03,825 प्रौढांच्या डोळ्यांची तपासणी केली आहे.