इंदापूर : काही दिवसांपूर्वी माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी राज्यात सुरू असलेल्या ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईवरुन सूचक वक्तव्य केलं होतं. भाजपमध्ये आल्याने मस्त आणि निवांत आहे, शांत झोप लागते, कारण सध्या आपली चौकशी वगैरे काही सुरू नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. यावरुच आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील टोला लगावलाय. तालुक्यात विकास कामे केल्यामुळे मला शांत झोप लागते, असा टोला राज्यमंत्री भरणे यांनी मारलाय.
काय म्हणाले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे?
इंदापूर तालुक्यात विकास कामे केल्यामुळे मला शांत झोप लागते असे म्हणत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील टोला लगावलाय. इंदापुरात मौर्य एम्पायर कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन समारंभात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. मावळ पेरणेफाटा येथील हॉटेल राजवर्धन ढाब्याच्या उद्घाटनासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आल्यानंतर राजकीय नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्यावरूनच्या विषयाच्या मुद्द्यावर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मिश्कीलपणे टोला लगावला होता. यावर दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बोचरी टिका केली होती. आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याच मुद्याला हात घालत नाव न घेता टीका केली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं स्पष्टकरण
मी भाजपमध्ये गेलोय त्यामुळे मला कशाची चिंता राहिलेली नाहीये. माझ्या वक्तव्याचा आणि चौकशीचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी केलाय. माझ्या आधीच्या वक्त्यांनी तुम्ही भाजपात का गेला असं विचारलं असता मी त्याला उत्तर दिलंय. मी भाजपमध्ये गेल्यामुळे मला कुठलीही अडचण नाहीये. बुधवारी 13 ऑक्टोबरला मावळमध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मला कसलीही चिंता नाहीये. मामाझ्या मागे कोणत्याही प्रकारची चौकशी फिवकशी नाहीये, त्यामुळे मला शांत झोप लागते, असं वक्तव्य केलं होतं. यानंतर हर्षवर्धन पाटील चांगलेच चर्चेत आले होते. त्यावर हर्षवर्धन पाटलांनी यावर इंदापूरमध्ये खुलासा केला.