23rd May In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजच्या दिवशी दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची फाळणी झाली आणि पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी अशी स्थापना झाली. तर, भारताचे माजी क्रिकेटपटू माधव मंत्री आणि संगीतकार आनंद मोडक यांचे निधन आजच्या दिवशी झाले. 



1896 : संगीत दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते केशवराव भोळे यांचा जन्म.


1896 साली भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार आणि समालोचक तसचं, नाट्य-मन्वंतर या नाट्यसंस्थेचे ते संस्थापक केशवराव भोळे यांचा जन्मदिन. मराठीतील प्रसिद्ध संगीत समीक्षक,
संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट आदी विषयांचे चिकित्सक होते. जुलै 1933 मध्ये ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेच्या आंधळ्यांची शाळा ह्या वि. वर्तकलिखित प्रसिद्ध नाटकामध्ये त्यांनी केलेले पहिलेच बिंबाचे (नायिका) काम अतिशय गाजले. केशवरावांचाही ‘नाट्यमन्वंतरा’शी संबंध जडला. आंधळ्यांची शाळामध्ये ज्योत्स्ना भोळे गायलेल्या दोन गाण्यांची सुभग भावपूर्ण स्वररचना केशवरावांनीच केली होती. ह्या सर्वांमुळे केशवराव संगीताचे नवरचनाकार म्हणून प्रसिद्धीस आले. ‘एकलव्य’ ह्या टोपणानावाने केशवराव भोळे ह्यांनी वसुंधरा ह्या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या रमणीय शैलीमुळे आणि माहितगारीमुळे विख्यात झाले.


1943:  वन्यजीव संरक्षक रोमुलस व्हिटेकर यांचा जन्मदिवस 


रोमुलस व्हिटेकर हे अमेरिकन-भारतीय पशुवैद्य, वन्यजीव संरक्षक आणि मद्रास स्नेक पार्क, अंदमान आणि निकोबार एन्व्हायर्नमेंटल ट्रस्ट (ANET) आणि मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्टचे संस्थापक आहेत. 2005 मध्ये निसर्ग संवर्धनातील उत्कृष्ट नेतृत्वासाठी व्हिटली पुरस्काराचे विजेते होते. त्यांनी या पुरस्काराचा उपयोग किंग कोब्रा आणि त्यांच्या अधिवासाच्या अभ्यासासाठी कर्नाटकात अगुंबे रेनफॉरेस्ट संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी केला. वन्यजीव संरक्षणातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


व्हिटेकर हे चेन्नईतील स्नेक पार्कचे संस्थापक संचालक होते. साप पकडण्यात निपुण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरुला जमातीचे पुनर्वसन करण्यासाठी या उद्यानाची संकल्पना करण्यात आली होती. सापांच्या व्यापारावर बंदी घातल्यानंतर आदिवासी बेरोजगार झाले. व्हिटेकरने विषरोधी औषधे तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सापाचे विष काढण्यासाठी इरुला जमातीत सामील होण्यास मदत केली. रोम हे मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्ट सेंटर फॉर हर्पेटोलॉजीचे संस्थापक-संचालक आहेत, जे मगरींचे प्रजनन आणि संवर्धन कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. 


1949: दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम जर्मनीची स्थापना


दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांकडून नाझींचा पराभव झाला आणि हिटलरच्या जर्मनीची फाळणी झाली. दोस्त राष्ट्रांमध्ये अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रशिया यांचा समावेश असला तरी सोव्हिएत रशिया हा साम्यवादी विचारांचा होता. तर, इतर राष्ट्रे भांडवलशाहीवादी राष्ट्रे होती. जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर त्याच्यावरील नियंत्रणाच्या वादातून सोव्हिएत रशिया आणि इतर देशांनी जर्मनीची फाळणी केली. हे राष्ट्र चार तुकडय़ांत विभागले गेले. एकेका भागावर एकेका विजेत्याचा कब्जा. पुढे फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका या दोस्तांच्या नियंत्रणाखाली असलेला भाग म्हणजे पश्चिम जर्मनी आणि साम्यवादी रशियाच्या आधिपत्याखाली असलेला भाग पूर्व जर्मनी अशी सरळसरळ विभागणी करण्यात आली. 


2014: भारताचे माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांचे निधन


शालेय जीवनातच त्यांना क्रिकेटची गोडी लागली. त्यांनी रणजी सामन्यांमधून आपल्या करिअरला सुरावात केली. रणजी सामन्यांमध्ये त्यांनी मुंबईचे प्रतिनिधीत्व देखील केले होते. ते मुंबई संघाचे कर्णधार होते. सलावीर आणि उत्कृष्ट यष्टिरक्षक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने तीन वेळा रणजी मालिका जिंकली. 1948-49 मध्ये महाराष्ट्राच्या संघाविरुद्ध मुंबईकडून खेळताना रणजीच्या फायनलमध्ये त्यांनी 200 धावा करत क्रिकेट प्रेमींची मन जिंकून घेतली. या सामन्यात तब्बल नऊ शतके लागली होती. मात्र माधव मंत्री एकटेच द्विशतकापर्यंत पोहोचू शकले होते. या सामन्यात दोन्ही संघाच्या मिळून 2376 धावा झाल्या होत्या, जो आजही रणजी क्रिकेटमधला विक्रम आहे. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला होता.  माधव मंत्री हे प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये 95 सामने खेळले आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ते चार सामने खेळले होते. 


2014: संगीतकार आनंद मोडक यांचे निधन 


आनंद मोडक हे भारतातील एक बहुमुखी, लोकप्रिय आणि दिग्गज संगीत दिग्दर्शक होते. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांसह अनेक चित्रपटांना संगीत दिले. आनंद मोडक हे आपल्या संगीतातील प्रायोगिक शैलीसाठी प्रसिद्ध होते.  लपंडाव (1993), चौकट राजा (1991), तू तिथे मी (1998), नातीगोती (2006), हरिश्चंद्राची फॅक्टरी (2009), समांतर (2009) आणि डँबिस (2011) आदी चित्रपटातील गीतांना त्यांनी संगीतबद्ध केले होते.  महानिर्वाण, महापूर, खेळीया, रायगडाला जेव्हा जाग येते आदी नाटकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. 


इतर महत्त्वाच्या घटना:


1052: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म


1875: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म


1951: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी 17 कलमी करार केला.


1956: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.


1997:  माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.