Jayant Patil ED:  IF & LS कंपनी घोटाळा प्रकरणी ईडीकडून आज जयंत पाटील (Jayant Patil) यांची तब्बल नऊ तास चौकशी केली. चौकशी झाल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ईडीकडून चौकशी झाली. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर दिली आहे. त्यांचं समाधान होईल अशी उत्तर दिली आहेत. माझा संबधित कंपनीशी काहीही संबंध नाही असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 


चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणांसह स्वागत केले. जयंत पाटील यांनी म्हटले की, आजच्या चौकशीनंतर ईडीकडे आता कुठलेही प्रश्न नसतील अशी अपेक्षा आहे. IF & LS कंपनीबाबत मला माहिती नाही. मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले असेल. मी चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनीदेखील चांगली वागणूक दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल उगाच तक्रार करणार नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. माझ्यावर आरोप करण्यात आला होता की काही उपकंत्राट देणाऱ्या कंपनीनं पैसै दिले होते. मात्र, हे आरोप साफ चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपला या घोटाळ्याशी काहीच संबंध नसल्याचा पुनरुच्चार जयंत पाटील यांनी केला. माझ्या कोणत्याच कंपनीने IF & LS कंपनीसोबत व्यवहार केला नाही. या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचेही पाटील यांनी सांगितले. 


जयंत पाटील यांनी सांगितले की, चौकशीला विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरानंतर ते टायपिंग करण्यासाठी आणि इतर कार्यालयीन कामामुळे वेळ लागला. याच दरम्यान, ईडी कार्यालयात 'शिवकालीन महाराष्ट्र' अर्ध पुस्तक वाचून झालं असल्याचे त्यांनी म्हटले.


जयंत पाटील यांच्यावर ईडीचे आरोप काय?


- 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीच कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंपनीला देण्यात आलं होतं. 


- संबंधित कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देण्यात आलं. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. 


- ज्यावेळी हे पैसे देण्यात आले त्यावेळीं जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होतें


आयएल अँड एफएस कंपनीचं प्रकरण काय?


- IL&FS कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही. 


- सरकारकडून मिळणारे 17 हजार कोटी अडकले आहेत. कंपनीचे एकूण 250 पेक्षा अधिक सब्सिडिरीज आणि जाँईंट व्हेंचर्स आहेत. 


- जमिनीच्या वादात जास्त नुकसानभरपाई दिल्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढला. अनेक महत्त्वाचे म्युचअल फंडस् आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्या आहेत.


- विजय मल्ल्याच्या किंगफिशर कंपनीची परिस्थिती बिकट झाली होती. त्यांची जितकं विमानं हवेत होती, त्यापेक्षा कितीतरी जास्त विमानं इंधनं न भरल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे पडून होती. असं असूनसुद्धा या परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं नाही किंवा जाणवू दिलं नाही. 


-  जेव्हा कर्जाचे हप्ते फेडण्यास माल्या यांनी असमर्थता दर्शवली आणि किंगफिशर कंपनी बंद केली तेव्हा हे सगळं समोर आलं.