21 September In History :  इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 1857 च्या उठावाचे नेतृत्व करणारे शेवटचे मुघल सम्राच बहादूर शहा जफर यांना आजच्या दिवशी ब्रिटिशांनी अटक केली होती. जगभरात नावाजलेली, दरारा असणारी भारताची गु्प्तचर संस्था 'रॉ'चा आज स्थापना दिन आहे. 


जागतिक अल्झायमर दिवस


21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिवस (Alzheimer’s Day) म्हणून ओळखला जातो. लोकांना या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या आजारात रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते आणि माणूस स्वत:कडे लक्ष देण्यासाठी असमर्थ होतो. अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने 1906 साली ह्या आजाराचा शोध लावला. 


गेल्या काही वर्षांत, अल्झायमर हा एक सामान्य आजार म्हणून उदयास आला आहे. अल्झायमर हा एक प्रकारे मेंदूचा आजार आहे, ज्यामुळे व्यक्तीचा मेंदू कमकुवत होतो आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो. पूर्वी हा आजार मोठ्या प्रमाणात वृद्धांमध्ये दिसून येत होता. परंतु, तणाव आणि नैराश्यामुळे आता तरुणांनादेखील या आजाराचा प्रादुर्भाव होतो. जागरूकतेचा अभाव हे देखील अल्झायमरच्या वाढीचे एक कारण आहे. 'अल्झायमर दिनाच्या' दिवशी लोकांना या आजाराची लक्षणे, कारणे आणि उपचारांबाबत जागरूक केले जाते. 


1857 : ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली, बादशाह बहादूर शाह जफरला अटक


भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये 1857 च्या उठावाचं (1857 Revolt) महत्त्व वेगळंच आहे. ब्रिटिशांची गुलामी मोडून काढण्याचा पहिला प्रयत्न या उठावाच्या माध्यमातून करण्यात आला. देशभरातील क्रांतिकारकांनी शेवटचा मुघल सम्राट बहादूरशाह जफर याला दिल्लीचा बादशाह घोषित केलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली लढा सुरू केला. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी यांनी लढा दिला. उठावकर्त्यांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि मुघल साम्राज्याची पुन्हा स्थापना झाल्याचं जाहीर केलं. 


ब्रिटिशांनी आजच्याच दिवशी, 21 सप्टेंबर 1857 रोजी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली आणि उठाव मोडून काढला. 82 वर्षीय बादशाह बहादूरशाह जफर याला ब्रिटिशांनी अटक केली. नंतर त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि रंगून म्हणजे आजच्या म्यानमारमध्ये त्याला नजरकैदेत ठेवण्यात आलं. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. 


बहादूरशाहा जफर हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट व तिमूरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता. तो मुघल सम्राट दुसरा अकबरशाह व त्याची हिंदू राजपूत बायको लालबाई यांचा पुत्र होता. भारतातील तमाम संस्थाने खालसा केल्याने, तनखे रद्द केल्याने सर्व राजांच्या मनातही असंतोष खदखदत होता व अशा राजांनीही 1857 च्या उठावास सक्रिय पाठिंबा दिला होता. या उठावाच्या वेळी बादशाहचे वय 82 होते. 


1929 : शास्त्रीय गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 


प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक  गणेश बलवंत नवाथे अर्थात पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा आज जन्मदिन. गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले. संगीत शिकण्यासाठी त्यांनी 21 गुरू केले. 


सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी रंगभूमीसाठीदेखील योगदान दिले आहे. त्यांनी 17 संगीत नाटकांना संगीत दिले आहे. संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग रसिकांना भावले. अभिषेकींनी जसं स्वतः संगीत दिलं तसं दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले.


मत्स्यगंधा, लेकुरे उदंड झाली, कटयार काळजात घुसली, बिकट वाट वहिवाट, देणाऱ्याचे हात हजार, तू तर चाफेकळी आदी नाटकांना त्यांनी संगीतबद्ध केले. शौनक अभिषेकी, देवकी पंडित, राजा काळे, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, हेमंत पेंडसे, शुभा मुद्गल, महेश काळे आदी त्यांचे शिष्य होते. 


संगीत क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने 1998 मध्ये पद्मक्षी या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. त्याशिवाय, नाट्यदर्पण, संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, मास्टर दिनानाथ स्मृती पुरस्कार, सरस्वती पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. 


1968 : भारताची गुप्तचर संस्था 'रॉ'ची स्थापना


परदेशात काम करणारी भारताची गुप्तचर संस्था 'रिसर्च अँड ॲनालिसिस विंग'चा (RAW) आज स्थापना दिन.  भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान युद्धानंतर शत्रू देशाच्या गोटातून माहिती मिळवण्यासाठी रॉ ची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली. रॉने आपल्या स्थापनेपासूनच मोठ्या मोहिमा पडद्याआडून पूर्ण केल्या. काही मोहिमांना बळ दिले. 1971 चे बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सिक्कीमचे एकत्रीकरण यामध्ये रॉचा मोठा वाटा राहिला आहे. 


रिसर्च एंड एनालिसिस विंगच्या स्थापनेपूर्वी, ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (IB) माहिती जमा केली जात असे. 1962 च्या भारत-चीन युद्धात आयबीवर असलेल्या मर्यादा केंद्र सरकारच्या लक्षात आल्या. त्यानंतर 1968 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर पूर्णपणे स्वतंत्र सुरक्षा संस्थेची गरज असल्याचा निर्णय घेण्यात आला. रामेश्वर नाथ काओ हे रॉचे पहिले संचालक होते. रामनाथ काओ हे भारत सरकारचे नावाजलेले गुप्तचर होते.  RAW ला परकीय माहिती, मानवी आणि तांत्रिक आणि डायरेक्टर-जनरल ऑफ मिलिटरी इंटेलिजन्स यांना सीमापार माहिती गोळा करण्यासह समांतर जबाबदारी सोपवण्यात आली होती. रॉच्या अनेक मोहिमांमध्ये काओ यांचा सिंहाचा वाटा होता. 'रॉ' च्या अनेक मोहिमा अनेक वर्षे गुप्त राहिल्या आहेत. भारताच्या परराष्ट्र धोरणापासून ते इतर संरक्षण विषयक बाबींमध्ये 'रॉ'चे मोछे योगदान आहे. 


इतर महत्त्वाच्या घटना :


1902: पेंग्विन बुक्स चे संस्थापक ऍलन लेन यांचा जन्म.
1944: चित्रपट निर्माते, कवी, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म.
1963: वेस्ट इंडीजचा जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रोस यांचा जन्म
1979: जमैकाचा क्रिकेटपटू ख्रिस गेल यांचा जन्म.
1980: अभिनेत्री करीना कपूर यांचा जन्म.
1982: मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन. 
1992: चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचे निधन.
2022 : भारतीय अभिनेता, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन