मुंबई : राज्यात उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईत (Mumbai) लालबागच्या (Lalbaugcha Raja News) राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भक्तांनी आदल्या दिवसापासूनच रांग लावली होती. भक्तांनी यंदाही राजाच्या चरणी भरभरून दान दिले आहे. भक्तांनी रोख रकमेत आणि सोन्याचांदीच्या दागिन्यांच्या रुपात राजाला दान दिलं आहे. त्याची मोजदाद आजपासून सुरु झाली. भक्तांनी रोख रकमेत मोठ्या प्रमाणात दान दिले आहे.
पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जवळपास 20 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांसह अनेक बॉलिवुड कलाकार, राजकीय नेत्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. आज उशिरापर्यंत लालबागचा राजा मंडळाकडून पहिल्या दिवशी दान आलेली रोख रक्कम, वस्तूंची मोजदाद पूर्ण करण्यात आली.
लालबागच्या राजाच्या चरणी पहिल्या दिवशी भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची आज (बुधवार, 20 सप्टेंबर) दिवसभर मोजदात करण्यात आली. यामध्ये भाविकांकडून 42 लाख रुपयांची रोख रक्कम जमा करण्यात आली. त्याशिवाय, 198.550 ग्रॅम सोने आणि 5440 ग्रॅम चांदीच्या वस्तू राजाच्या चरणी अर्पण करण्यात आल्या आहेत.
लालबागच्या राजाच्या दानपेटीत आलेल्या सोन्याचांदीच्या या वस्तूंचा नंतर लिलाव केला जातो. त्यातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात.
दरम्यान, मुंबईतील गिरणगावात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासह गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळी येथील चिंतामणी, तेजुकाया गणेशोत्सव मंडळाचे गणपती पाहण्यासाठी गर्दी उसळली आहे.
दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप
आज राज्यभरात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचे आज विसर्जन (Ganesh Visarjan) पार पडले आहे. मुंबईत महापालिकेच्यावतीने (BMC) गणेश विसर्जनाची (Ganesh Immersion) तयारी करण्यात आली आहे. कृत्रिम तलाव आणि सार्वजनिक नैसर्गिक विसर्जन स्थळांवर दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला जात आहे. राज्यातही विविध ठिकाणी स्थानिक प्रशासनांकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी केली आहे. तर, दुसरीकडे गणेश भक्तांकडून बाप्पांना वाजत, गाजत निरोप देण्यात येत आहे. कोकणात पारंपरीक पद्धतीने बाप्पाला निरोप देण्यात आला.