ठाणे: 2 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या विरोधात सबळ पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तिलाही याप्रकरणी आरोपी करण्यात आलं आहे. लवकरच ममता कुलकर्णीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात येणार असल्याची माहिती, ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली.


 

12 एप्रिलला 2 हजार कोटी रूपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.  8 जानेवारीला या ड्रग्ज तस्करीची बैठक केनियामध्ये झाली होती. त्या बैठकीला ममता कुलकर्णी उपस्थित होती.  2 साक्षीदारांनी ममता कुलकर्णीच्या विरोधात साक्ष दिली आहे. त्यामुळे सर्व पुरावे बघता ममता कुलकर्णीला आरोपी घोषीत करण्यात आलं आहे.

 

ममतासोबतच तिचा पती विक्की गोस्वामी,ड्रग्ज जगतातलं कुख्यात नाव असलेला अब्दुल्ला, आणि अन्य 7 वॉन्टेड आरोपी असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

 

ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीत एकूण 2 कोटी शेअर्सपैकी 11 लाख शेअर्स ममताच्या नावावर केले जाणार होते.  या कंपनीचं जाळं साऊथ अफ्रिका, कोलंबिया, अमेरिका आणि भारतात पसरल्याचं सिंह यांनी सांगितलं.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे.


सोलापुरातील 2200 कोटींचं ड्रग्ज साठा प्रकरण: मास्टरमाईंड अखेर गजाआड


 

कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून  2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं.

 

या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

 

संबंधित बातम्या


एफिड्रिन ड्रग प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या नवऱ्याचं नाव

सोलापुरातील 2200 कोटींचं ड्रग्ज साठा प्रकरण: मास्टरमाईंड अखेर गजाआड

ठाणे इफेड्रीन ड्रगप्रकरणात माजी आमदाराचा मुलगा?

18 टन, 2 हजार कोटींचं एफेड्रिन ड्रग्ज जप्त

सोलापुरात 200 कोटींचं एफिड्रिन ड्रग जप्त