येत्या वर्षभरात मुंबई पुण्यासह पाच महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात सुरु आहे. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी खडसेंची पाठराखण केली.
शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
खडसेंचा स्वत:हून राजीनामा
मुख्यमंत्र्यांनी यावेळी एकनाथ खडसे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
"खडसेंवरील सर्व आरोप तथ्यहीन आहेत. लाचखोरी प्रकरणातील गजानन पाटीलशी खडसेंचा संबंध नाही हे एसीबीने सांगूनही त्यांच्यावर आरोप झाले. दाऊदचे फोन आल्याचा विषय झाल्यावर ATS कडे चौकशी दिली आणि त्यांनी निर्वाळा दिला की असा कुठला फोनच आला नाही. तर MIDC संदर्भात नाथाभाऊंनी राजीनामा दिला. चौकशी सुरु आहे. त्यामुळे मी बोलणार नाही. या अग्निपरीक्षेतून नाथाभाऊ बाहेर येणार याची खात्री आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे नाथाभाऊंनी स्वत: राजीनामा देऊन, चौकशीची मागणी केली आहे." असं मुख्यमंत्री म्हणाले.
गिरीष महाजनांवरही खोटे आरोप
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यावर महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप आहे. मात्र या आरोपानंतर आपण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर हे आरोप पूर्णत: चुकीचे असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित जमीन कोणाच्या नावे आहे, याबाबतची कागदपत्रं इंग्रजांच्या काळापासून तपासली. १८८५ च्या रजिस्टर मध्ये ही जमीन महार वतनाची नसल्याचं सिद्ध झालं. ही जमीन महार वतनाची नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने आरोप करते
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारचे भूखंड परत करावे, मग त्यांनी आमच्यावर आरोप करावे. हे लोक आम्हाला शिष्टाचार शिकवू शकत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी कोणत्या तोंडाने आरोप करते, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
ज्या दिवशी आम्ही भ्रष्टाचार करु, त्या दिवशी पद सोडून घरी जाऊ, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
५ वर्षांनी आम्हाला निवडून दिल्याचा जनतेला अभिमान वाटेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
खडसेंचीही हजेरी
बालंधर्व रंगमंदिरातील बैठकीला राज्यभरातील भाजपचे नेते दाखल झालेत. विशेष म्हणजे केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीकडे पाठ फिरविणाऱ्या एकनाथ खडसेंनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला मात्र हजेरी लावली. बैठकीमध्ये खडसे व्यासपीठावर होते. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर यांचीही उपस्थिती आहे.
दरम्यान या कार्यक्रमानिमित्त करण्यात आलेल्या बॅनरबाजीमुळे पुण्याचं विद्रुपीकरण झालं आहे. दोन दिवस चालणाऱ्या कार्यकारिणीचा उद्या समारोप होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील.