20 March Headlines : राज्यातील सरकारी, निमसरकरी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीचा संप आणखी तीव्र करणार, या आठवड्यात संपाचा पुढच्या टप्यातील कार्यक्रम संघटनांकडून जाहीर संपाचा 7 दिवस असून सरकार कडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने 18 लाख संपकऱ्यांनी आपला संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून संघटनांनी पुढील आठवड्याचा संपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सोमवारी राज्यातील शाळांमध्ये कॉलेज,कार्यलयामध्ये थाळीनाद आंदोलन करत सरकारच्या मागणी संदर्भातील नकारात्मक भूमिकेचा धिक्कार केला जाणार आहे. त्यानंतर 23 मार्च काळा दिवस पाळला जाणार आणि 24 मार्च माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान राज्यभर राबविले जाणार आहे.
विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होतोय. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती चर्चा आणि उत्तर होईल. मुंबईच्या चर्चेवरती सत्ताधारी आमदारांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरती नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उत्तर देतील. यावेळी सत्ताधारी आमदारांनी अनेक मुद्यांवर चौकशीची मागणी केली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळी मुळे नुकसान झाला आहे. तर पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत 76 जनावरे देखील या अवकाळी पावसामुळे दगावले आहेत. आता विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.
जी 20 परिषदेच्या सिव्हिल ट्वेंटी या उपसमितीची दोन दिवसीय बैठक आजपासून
नागपूर: जी 20 परिषदेच्या सिव्हिल ट्वेंटी या उपसमितीची दोन दिवसीय बैठक आजपासून नागपुरात सुरू होतीये. सकाळी 9 वाजता बैठकीला सुरुवात होणार असून सकाळच्या सत्रात विकास आणि पर्यावरणीय समतोल या विषयावरील चर्चासत्र होणार आहे. दुपारी 3 वाजता सिव्हिल ट्वेंटी (c20) बैठकीचा औपचारिक उद्घाटन होणार असून त्यामध्ये आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी या अध्यक्ष असणार आहे. उद्घाटन सोहळ्यात नोबल शांतता पारितोषिक विजेता कैलास सत्यार्थी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही उपस्थित राहणार आहे.
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा आज मोर्चा
महापालिकेने केलेली कर दरवाढ, स्वच्छतेचा प्रश्न, महापालिकेच्या प्रशासनाचा उडालेला बोजवारा या सर्व मुद्द्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचा आज मोर्चा काढणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन करण्याचा वंचितचा प्रयत्न आहे.