पुणे : देशात काँग्रेस पक्ष कमजोर झाला असून या पक्षाला कॅल्शियमचे इंजेक्शन दिले, तरी काही उपयोग नाही. या पक्षात आता काहीच राहीले नाही, अशा शब्दात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले, तेव्हा पक्षाच्या अध्यक्षांना पदावरून बाजू केले गेले. हे योग्य केले नसल्याचे सांगत राहुल गांधी यांचे नाव न घेता टोला देखील त्यांनी लगावला.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार हीना मोमीन, हडपसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीद शेख आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॅनियल लांडगे हे उपस्थित होते.
असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची परिस्थिती खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे आता देशातील जनतेला एसआयएम हा पक्ष सक्षम पर्याय वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, देशात भाजपची सत्ता आल्यापासून मॉब लिचिंगच्या घटना घडत आहे. या घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. या सर्व घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत जाऊन हजारो नागरिकांसमोर भारतात सर्व ठीक सुरू असल्याचे बोलतात. मोदी साहेब एवढ्या घटना होऊन देखील भारतात सर्व ठीक चालू असल्याचे कसं काय सांगू शकता, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
आमच्यावर आजवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आले आहे. या माध्यमांतून आवाज दाबण्याचे काम केले आहे. आता आम्ही अशा शक्तिंविरोधात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आजवर ज्या राजकीय पक्षांनी सत्ता भोगली, त्या सर्व पक्षांनी कधीच दलित समाजातील व्यक्तिला नेतृत्व करण्याची संधी दिली नाही. पण आता आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाणार आणि न्याय देण्याचे काम करणार असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.
काँग्रेस पक्ष कमजोर झालाय, कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उपयोग नाही : असदुद्दीन ओवैसी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Oct 2019 10:43 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेत जाऊन हजारो नागरिकांसमोर भारतात सर्व ठीक सुरू असल्याचे बोलतात. मोदी साहेब एवढ्या घटना होऊन देखील भारतात सर्व ठीक चालू असल्याचे कसं काय सांगू शकता, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -