सोलापूर : लठ्ठपणावर उपचार अत्याधुनिक उपचार करायचं म्हटलं तर लाखो रुपयांचं खर्च येतो. मात्र सामान्य लोकांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अंत्यत कमी दरात लठ्ठपणाची बिरियाट्रीक सर्जरी करण्यात येत आहे. याच सर्जरीमुळे तब्बल 194 किलोच्या रुग्णावर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

राज्यातील शासकीय रुग्णालंयामध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे सोलापूर शासकीय रुग्णालय पहिलेच असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली आहे. शासकीय रुग्णालयात प्रत्येक आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी देखील सुरु करण्यात आली आहे. जुलै 2019 पासून जवळपास 950 रुग्णांवर या रुग्णालयात अत्यंत माफक दरात तर काही रुग्णांवर मोफत देखील उपचार करण्यात आले आहेत. अतिलठ्ठ 9 रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत.

सानिया मिर्झाने 4 महिन्यांमध्ये घटवलं 26 किलो वजन; पाहा व्हिडीओ


लठ्ठपणावरील उपचार खूप महागडा असल्याने तो सामान्य रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे उपचाराअभावी रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचाच विचार करत शासकीय रुग्णालयात बिरियाट्रीक सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्याचा फायदा आता सामान्य रुग्णांना पोहोचताना दिसतोय. सोलापुरातील 30 टक्के लोकांना लठ्ठपणाचा त्रास असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती देखील यावेळी डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

त्यामुळे या रुग्णांनी शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील डॉ. ठाकूर यांनी केले. दरम्यान शस्त्रक्रिया आणखी जलद आणि योग्य रितीने व्हावी यासाठी शासनाकडे रोबोटची देखील मागणी करण्यात आली असून लवकरच याठिकाणी लेझर पद्धतीने देखील उपचार करणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

वजन कमी करायचंय?; दररोज करा आवळ्याच्या ज्यूसचं सेवन, होतील फायदेच फायदे


<