Uddhav Thackeray Rahul Gandhi : देशभरात विरोधकांची एकजूट उभारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून (Congress) सुरू आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मतभेद असल्याचे समोर आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरून आघाडीत बिघाडी होणार असल्याचे संकेत दिसून येत होते. मात्र, तिन्ही पक्षांनी डॅमेज कंट्रोल सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मातोश्रीवर येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज काँग्रेस नेते केसी वेणूगोपाल यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. राहुल गांधी देखील 'मातोश्री'वर येणार का, असा प्रश्न यावेळी विचारण्यात आल्यानंतर वेणूगोपाल यांनी भूमिका स्पष्ट केली. 


राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीबाबत बोलताना वेणूगोपाल यांनी म्हटले की, आम्ही उद्धव ठाकरे यांना दिल्ली भेटीचे निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरे हे दिल्लीत आल्यानंतर राहुल गांधी हे निश्चितपणे मुंबईत येतील, असे वेणूगोपाल यांनी सांगितले. तर, उद्धव ठाकरे यांनी आता आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या असल्याचे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे दिल्लीत ठाकरे कधी जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


काँग्रेस उद्धव यांच्या पाठीशी


हुकूमशाहीच्या विरोधात लढाई सुरू आहे. उद्धव ठाकरे कस लढत आहेत हे पाहत आहोत. ईडी, सीबीआयकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. इतरही पक्षांना टार्गेट करत आहेत. या सगळ्या लढाईत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत खंबीरपणे पाठिशी आहोत, असे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल राव यांनी म्हटले. आज मातोश्रीवर वेणूगोपाल यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


 


लोकशाही  वाचवण्याचा लढा


उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, फक्त विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणाचे समीकरण नाही. देशात विविध पक्ष आणि त्यांची विचारसरणी आहे. या पक्षांना एकत्रितपणे घेऊनसोबत जायचे आहे. त्याला लोकशाही म्हणतात. भाजप हाच एकमेव पक्ष राहील असे भाजपच्या अध्यक्षांनी म्हटले होते. ही भूमिका घातक आहे. शिवसेना या देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे असेही उद्धव यांनी म्हटले. आम्ही मैत्री निभावतो तेव्हा संबंध जोडतो. भाजपसोबत 25 वर्ष युती होती. पण त्यांना मित्र कोण, शत्रू कोण हे कळलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला.