18 January Headlines : नाशिच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीडमधील परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. याबरोबरच महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज मुंबईत होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा सोहळा
नाशिच्या त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आज हा भव्य दिव्य यात्रा सोहळा पार पडणार आहे. यंदा कोरोना निर्बंधमुक्तीमुळे मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतोय. महाराष्ट्रभरातून चारशे दिंड्या आणि जवळपास तीन लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वरला मुक्कामी पोहोचले आहेत. जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थानकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
राज ठाकरे बीडच्या परळी न्यायालयात हजर राहणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज बीडमधील परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. 2008 साली राज ठाकरे यांच्यावर राज्यभर गुन्हे दाखल झाले होते. बीड जिल्ह्यात देखील राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. याच प्रकरणी राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिले म्हणून परळी कोर्टाने दोन वेळा त्यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट काढले होते. त्यामुळे राज ठाकरे आज परळी कोर्टामध्ये हजेरी लावणार आहेत.
मुंबईत महाविकास आघाडीची बैठक
महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज मुंबईत होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
अमरावतीमधील तळेगाव दशासर येथे आज महिलांचा शंकरपट
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाद्वारे 15 तारखेपासून चार दिवसीय शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. रविवारी दो-दाणी, सोमवार आणि मंगळवारी एकदानी आणि आज म्हणजे बुधवारी महिलांचा शंकरपट होणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील शंकरपटाला सुरुवात झाली. 20 एकर जागेत हा पट आणि यात्रा भरली आहे. आज शेवटच्या दिवशी महिलांचा शंकरपट होणार असून महाराष्ट्रात सर्वात आधी याच तळेगाव दशासरच्या शंकरपटात महिलांना संधी देण्यात आली आहे.
संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी
शिवसेना नेते संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाते नेते संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना मुंबइ सत्र न्यायालयानं दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी करत ईडीनं हायकोर्टात धाव घेतली आहे. तसेच हा जामीन देताना पीएमएलए कोर्टानं आढलेले तीव्र ताशेरेही या निकालातून वगळण्याची मागणी तपासयंत्रणेकडून हायकोर्टात करण्यात आली आहे.
केतकी चितळेच्या याचिकेवर सुनावणी
गुन्हा रद्द करण्यासाठी केतकी चितळेनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणात शरद पावर यांनाही प्रतिवादी करण्यासाठी केतकीचा हायकोर्टात अर्ज आहे.
सांगलीत संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीची आज पत्रकार परिषद
संविधान बचाव ख्रिस्ती हक्क समितीची आज पत्रकार परिषद आहे. जिल्ह्यात धर्मपरिवर्तनाचे झालेले आरोपाच्या अनुषंगाने 20 जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.
शुभांगी पाटील यांची आज जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक
नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांची आज जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुढची रणनीती आणि प्रचारावर चर्चा होणार आहे.
ज्ञानवापी प्रकरणातील देखरेख याचिके संदर्भात सुनावणी
ज्ञानवापी प्रकरणातील देखरेख याचिके संदर्भात आज सुनावणी होणार आहे. ज्ञानवापी येथील भगवान आदि विश्वेश्वर यांच्या वतीने विश्व वैदिक सनातन संघाचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस किरण सिंग यांनी दाखल केलेल्या देखरेख याचिकेसंदर्भात (प्रकरण ऐकण्यायोग्य आहे की नाही) या याचिकेवर सुनावणी होईल.
हैदराबादमध्ये भारत आणि न्यूजीलॅण्डमील एक दिवसीय सामना
भारत आणि न्यूजीलॅण्ड दरम्यान पहिला एकदिवसीय सामना आज हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे.