Maharashtra Kesari Controversy : पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये पैलवान सिकंदर शेखवर (Sikander Sheikh) अन्याय झाल्याच्या भावना अनेक जण व्यक्त करत आहेत. स्वत: सिकंदर शेख याने देखील आपल्यावर अन्याय झाल्याचे बोलून दाखवले आहे. सेमी फायनलच्या लढतीत चुकीच्या पद्धतीने महेंद्र गायकवाड याला गुण दिल्याचा आरोप होत आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. परंतु, आता हा वाद थांबवण्यावर सांगलीतील अंबाबाई तालीम संस्थेने मार्ग शोधून काढलाय. महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय या संस्थेने घेतलाय.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. या लढतीत महेंद्रचा मारलेला टांग डाव पूर्णपणे बसला नतसाना त्याला चार गुण दिल्याचा आरोप सोशल मीडियावरून होत आहेत. हा फक्त सोशल मीडियापुरताच मर्यादित राहिला नाही तर तो आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. मुंबई पोलिस दलातील पोलिस कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांनी पंच मारूती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप सातव यांनी केलाय. यावरून कॉन्स्टेबल संग्राम कांबळे यांच्यावर पुण्यात गुन्हा देखील दाखल झालाय. परंतु, सांगलीच्या अंबाबाई तालीम संस्थेने हा वाद मिटवण्यासाठीचा मार्ग शोधून काढलाय.
काय आहे मार्ग?
या वादाला तिलांजली देण्याची भूमिका सांगली- मिरज मधील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी घेतलीय. त्यासाठी त्यांनी पैलवान सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये मातीतील निकाली कुस्त्यांचे खास मैदान अंबाबाई तालीम संस्थेच्या मैदानात लवकरच घेण्याची तयारी दर्शवली आहे. या दोघांमध्ये झालेल्या कुस्ती मधील विजेत्याला महाराष्ट्र केसरीच्या तोलामोलाची चांदीची गदा देऊन आणि महाराष्ट्र महाकेसरीचा 'खिताब देऊन गौरविण्यात येणार आहे.
या मैदानात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांनी येऊन लढावं आणि सध्या सुरू असलेला वाद थांबवावा अशी भूमिका शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे वस्ताद यांनी घेतली आहे. संजय भोकरे यांच्या या निर्णयाला पैलवान सिकंतर शेख याने प्रतिसाद देत या मैदानात येऊन लढण्याची तयारी देखील दर्शवली आहे. आता महेंद्र गायकवाडने देखील या मैदानात येऊन लढावे आणि हा कुस्ती मधील वाद थांबवावा असे आवाहन संजय भोकरे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या