मुंबई: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललाय. काही मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कोरोना राजभवनात पोहोचला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या मुंबईतील राजभवनात 14 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) त्यांची पुन्हा चाचणी करणार आहे.
माहितीनुसार, राज्यपालांच्या निवासस्थानी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. आता राजभवनात कुठल्याही बाहेरील व्यक्तिंना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पुढील आदेशापर्यंत सर्व बैठका देखील रद्द करण्यात आल्या आहेत.


8 दिवसांपूर्वी राजभवनामधील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्या संपर्कात 24 अधिकारी-कर्मचारी आले होते. या सर्वांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं होतं. तसेच त्यांच्यामध्ये विशेष लक्षण आढळलेली नाहीत. यानंतर राजभवनाच्या वतीने कार्यालयातील शंभर लोकांची कोरोना चाचणी विविध रुग्णालयांमध्ये करण्यात आली.  या चाचणीमध्ये 14 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. या अधिकारी - कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना त्यांच्या घरामध्ये विलगीकरण करून ठेवण्यात येईल का? तसंच ज्यांची घरं लहान आहेत, त्यांना इतर ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्याचा हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.


आज दिवसभर राजभवन आणि परिसरात बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी राज भवनामध्ये दाखल झालेले आहेत.


तब्येत अगदी ठणठणीत; स्व-विलगीकरणात नाही’: राज्यपाल कोश्यारी


राज्यपाल यांनी सांगितलं आहे की, आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिति पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहे. या संदर्भात आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.





राज्यात काल कोरोना रुग्णसंख्यने उच्चांक गाठला आहे. राज्यात दिवसभरात तब्बल 8 हजार 139 नवे कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 223 मृत्यू मागील चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत. या संख्येमुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्येने आता दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आतापर्यंत 10 हजार 116 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 4 हजार 360 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2 लाख 46 हजार 600 इतकी झाली आहे. यापैकी 1 लाख 36 हजार 985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला 99 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात 6 लाख 80 हजार 17 लोक होम क्वॉरंटाइन आहेत. तर 47 हजार 376 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत. आत्तापर्यंत 12 लाख 85 हजार 991 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी 2 लाख 46 हजार 600 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 55.55 टक्के इतके झाले आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे महत्वाच्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेत ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या लॉकडाऊन लागू आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी याठिकाणी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.