वर्धा : आष्टी तालुक्यातील भिष्णुर गावातील भीषण आगीत 15 घरं जळून खाक झाली आहेत. या आगीत घरांमधील साहित्यासह तूर-कापूसही जळाल्याने लाखोंचं नुकसान झाले आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
आष्टी तालुक्यातील भिष्णुर येथे नदीकाठच्या भागातील काही घरांना सुरुवातीला आग लागली. त्यानंतर आजूबाजूच्या 15 घरात आग पसरली. आग लागताच घरातील लोक सैरावैरा पळत सुटल्यानं गावात खळबळ उडाली.
सुरुवातीला गावातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वत्र लाकूड-फाटा आणि अंगणातील वाळलेल्या झाडांनी पेट घेतला.
अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं. सोबतच अनेकांच्या घरात असलेल्या तूर आणि कापूससुद्धा जळल्याची माहिती मिळते आहे.
महसूल विभागाकडून पंचनामे सुरु करण्यात आले असून, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचं तहसीलदार सीमा गजभिये यांनी सांगितलं.