नवी मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी आत्मक्लेश यात्रा काढली आहे. या यात्रेत राजू शेट्टी यांचा मुलगा सौरभ शेट्टीही पुण्याहून मुंबईत पायी चालत आला आहे.
शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना सोबत घेऊन राजू शेट्टींनी काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींचा मुलगा सौरभही सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे पुण्यापासून सौरभ चालत मुंबईत आला आहे. शिवाय, राजू शेट्टींच्या नेतृत्त्वातील आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन तोही राजभवनावर धडकणार आहे.
शेतकऱ्यांची दु:ख आपल्यालाही माहित असल्याचे सौरभ सांगतो. शिवाय, कॉलेजमधील मित्राच्या वडिलांनी शेतीत कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली होती. यानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत पाहून आपल्याला राग आल्याने या यात्रेत सहभागी झाल्याचे सौरभ सांगतो.
राजू शेट्टींच्या पायाला सूज आली असून, फोडही आले आहेत, याबाबत सौरभला विचारले असता, त्याने सांगितले, “शेट्टी साहेब कुणाचंही ऐकणार नाही. ते आत्मक्लेश यात्रा पूर्ण करतील. साक्षात मुख्यमंत्री आले, तरी ते ऐकणार नाहीत.”
खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्त्वातील आत्मक्लेश यात्रेच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या संख्येने 30 मे रोजी राजभवनावर धडकणार आहेत.
आत्मक्लेश यात्रेतून खासदार शेट्टींच्या मागण्या काय?
शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा इत्यादी मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांकडून पाय धुवून घेण्याची भाजप नेत्यांची लायकी नाही : शेट्टी
आत्मक्लेश यात्रेत राजू शेट्टींच्या पायांना सूज आणि फोड!