15 April In History : शीख धर्माच्या अनुयायांसाठी 15 एप्रिलचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु बाबा गुरु नानक यांचा जन्म याच दिवशी झाला. 15 एप्रिल 1469 रोजी नानकाना साहिब या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. गुरू नानक यांनी आपलं संपूर्ण जीवन हे मानवी कल्याणासाठी समर्पित केलं. प्रेम, सेवा, परोपकार, मानवतावाद, समता, बंधुता आणि परोपकार या गोष्टी त्यांनी शिकवणीतून दिल्या. यासह इतिहासात आजच्या दिवशी इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या त्या पाहू,


1452 :  लिओनार्डो दा विंची यांचा जन्म


युरोपच्या 15 व्या शतकातील प्रबोधनकाळातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे लिओनार्डो दा विंची. प्रसिद्ध चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ अशी ओळख असलेल्या लिओनार्डो दा विंची यांचा जन्म फ्रान्समध्ये 15 एप्रिल 1452 रोजी झाला. लिओनार्डो दा विंची यांचे मोनालिसा हे ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध चित्र, त्याच्यातील गुढ रहस्यामुळे कायम स्मरणात राहतं. त्याचसोबत येशू ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित द लास्ट सफर हे चित्र तसेच मॅडोना ऑफ द रॉक्स हे चित्र जगप्रसिद्ध आहे. 


1469 : शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचा जन्म


शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक (Guru Nanak) यांचा जन्म 15 एप्रिल 1469 साली पंजाब (Punjab)  प्रांतातील तलवंडी, ज्याला आता नानकाना साहिब म्हटलं जातं, या ठिकाणी झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तामध्ये आहे. नानकांचा लहानपणापासूनच अध्यात्म आणि भक्तीकडे ओढा होता. पंजाबी, फारशी आणि अरबी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतं. वयाच्या 11 व्या वर्षी जनेऊ घालण्याची प्रथा पाळली जात असताना त्यांनी पुराणमतवादाविरोधात संघर्ष सुरू केला. 


गुरू नानक यांनी देशभर प्रवास केला. सन 1521 पर्यंत त्यांनी भारत, अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांतील प्रमुख स्थांनांना भेटी दिल्या. गुरू नानक हे सर्वेश्वरवादी होते. त्यांनी त्यांच्या उदारमतवादी दृष्टिकोनाने सर्व धर्मातील चांगुलपणा आत्मसात केला. देव एक आहे, हिंदू मुस्लिम सर्व एकाच देवाची मुले आहेत अशी त्यांची शिकवण होती. देवाच्या समोर सर्व लोक समान आहेत असं ते म्हणायचे. गुरू नानक यांनी रचलेल्या कविता नंतर शिखांचा पवित्र ग्रंथ 'गुरू ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.


गुरू नानक यांनी आपलं संपूर्ण जीवन हे मानवी कल्याणासाठी समर्पित केलं. प्रेम, सेवा, परोपकार, मानवतावाद, समता, बंधुता आणि परोपकार या गोष्टी त्यांनी शिकवणीतून दिल्या. याच मूल्यांवर आधारित त्यांनी शिख धर्माची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला.


1865 : अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन (Abraham Lincoln) यांची 15 एप्रिल 1865 रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 1862 साली अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेत गुलामगिरी संपुष्टात आणण्याची घोषणा केली.  जॉन विल्क्स बूथ या गुलामगिरीच्या प्रथेच्या समर्थकाने लिंकन यांची हत्या केली. वॉशिंग्टन डीसीच्या फोर्ड थिएटरमध्ये नाटक पाहत असताना अब्राहम लिंकन यांना गोळ्या घालण्यात 


1922 : मधुमेहावरील इन्सुलिन सर्वसामान्यांसाठी उपलब्ध 


मधुमेह असणाऱ्यांसाठी वरदान ठरणारी लस अशी ओळख असलेले इन्सुलिन (Insulin) 15 एप्रिल 1922 रोजी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आले. 


1932 :  सुरेश भट यांचा जन्मदिन


मराठीतील सुप्रसिद्ध कवी सुरेश भट (Suresh Bhat) यांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी अमरावती या ठिकाणी झाला. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' ही त्यांची प्रसिद्ध रचना आहे. कवी, पत्रकार आणि मराठी गझलकार अशी सुरेश भट यांची ओळख आहे. 'गझल' हा काव्यप्रकार सुरेश भटांमुळे सामान्य रसिकांमध्ये लोकप्रिय झाला. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते.  गडचिरोली येथे भरलेल्या 39 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. 


सुरेश भटांचे प्रमुख साहित्य



  • एल्गार (1983)

  • काफला

  • झंझावात (1994)

  • रंग माझा वेगळा (1974)

  • रसवंतीचा मुजरा

  • रूपगंधा (1961)

  • सप्‍तरंग (2002)

  • सुरेश भट - निवडक कविता

  • हिंडणारा सूर्य (गद्य)


2004: फ्रान्समधील शाळांमध्ये सर्व धार्मिक चिन्हांवर बंदी


फ्रान्समध्ये 15 एप्रिल 2004 रोजी शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक चिन्हाच्या वापरावर बंदी घालणारा कायदा मंजूर करण्यात आला होता. हा कायदा 2 सप्टेंबर 2004 पासून लागू झाला. यामध्ये मुस्लिम मुलींनी घातलेला स्कार्फ, शीख मुलांचा पगडी, ख्रिश्चन मुलांचा क्रॉस या सर्वांवर बंदी घालण्यात आली होती.