मुंबई : 14 नोव्हेंबर ही तारीख स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस म्हणून इतिहासात नोंदली गेली आहे. त्यांची जयंती ही बालदिन म्हणूनही साजरी केली जाते. 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद (आता याचं नाव बदलून प्रयागराज करण्यात आले आहे) येथे जन्मलेल्या नेहरुंना लहान मुलं फार आवडायची. 1964 पूर्वी भारतात 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जात होता, परंतु जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांचा वाढदिवस म्हणजेच 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक देशांमध्ये 1 जून हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. काही देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेनुसार 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करतात. आजच्याच दिवशी क्रिकेटचा देव म्हणून ज्याला संपूर्ण जग ओळखतं त्या सचिन तेंडूलकरने त्याचा 200 वा आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली होती. 


1889 : पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म


पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये झाला. स्वतंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधानपद पंडित जवाहरलाल नेहरुंनी भूषवले होते.  नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते 1930 आणि 1940 च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले. नेहरूंनी 1950 च्या दशकात संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार केला आणि आधुनिक राष्ट्र म्हणून भारताच्या प्रतिमेवर जोरदार प्रभाव पाडला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये त्यांनी भारताला शीतयुद्धाच्या दोन गटांपासून मुक्त केले. एक प्रतिष्ठित लेखक असलेल्या नेहरुंची तुरुंगात लिहिलेली पुस्तके, जसे की लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर (1929)ॲन ऑटोबायोग्राफी (1936) आणि द डिस्कव्हरी ऑफ इंडिया (1946) ही जगभरात वाचली जातात. त्यांच्या हयातीपासूनच सन्माननीय पंडित हे सामान्यतः त्यांच्या नावापुढे भारतात लावले जात होते. त्यांना लहान मुलांची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. 



1907: हिंदी भाषेचे प्रसिद्ध भारतीय साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांची जयंती 


हरिवंशराय बच्चन हे हिंदी भाषेतील कवी होते, असे मानले जाते की त्यांच्या कवितांनी भारतीय साहित्य बदलले होते. त्यांची शैली पूर्वीच्या कवींपेक्षा वेगळी होती. म्हणूनच त्यांना नव्या शतकाचा लेखक म्हटले जात होते. त्यांच्या कलाकृतींनी भारताच्या कवितेत एक नवीन प्रवाह निर्माण केला. हरिवंशराय बच्चन यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 रोजी अलाहाबादजवळील प्रतापगड जिल्ह्यातील बाबूपट्टी या छोट्याशा गावात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांचे पुत्र आहेत. मधुशाला हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. 18 जानेवारी 2003 रोजी त्यांचं निधन झालं. 


1919: स्वातंत्र्यसैनिक लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांची जयंती


अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1919 रोजी झाला. ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक, संपादक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अनंत काशिनाथ भालेराव यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. याबद्दल सक्तमजुरीच्या आणि तुरुंगावासाच्या शिक्षाही त्यांनी भोगली. स्वातंत्र्योत्तर काळात औरंगाबादहून प्रसिद्ध होत असलेल्या दैनिक मराठवाडातून त्यांनी सातत्याने समाजहिताची, विकासाची भूमिका घेत लेखन केले. विकासासाठी जनतेने केलेल्या आंदोलनांत आणि पत्रकार आणि साहित्यिकांची एक पिढी घडवण्यात भालेराव यांनी महत्वाची भूमिका बजावली.


1922: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन कंपनीने युनायटेड किंग्डममध्ये रेडिओ सेवेची केली सुरूवात 


बीबीसी हे जगातील सर्वात मोठे ब्रॉडकास्टर्स आहे. 18 ऑक्टोबर 1922 रोजी लंडनमध्ये याची औपचारिक स्थापना झाली. 14 नोव्हेंबर 1922 रोजी बीबीसीने आपली पहिली रेडिओ सेवा सुरू केली होती. 


1971: कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन


नारायण हरी आपटे हे मराठी , कादंबरीकार, व्याख्याते आणि प्रकाशक होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील समडोळी येथे झाला. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले. ते किर्लोस्कर खबर (पहिले उपसंपादक), उद्यान, लोकमित्र तसेच आल्हाद साप्ताहिक व मधुकर या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. ‘आपटे आणि मंडळी’ या नावाने प्रकाशनगृह स्थापन केले. प्रकाशन करण्यासाठी स्वतःचा ‘श्रीनिवास छापखाना’ कोरेगाव येथे सुरू केला. नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास साठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. 


न पटणारी गोष्ट (1923), सुखाचा मूलमंत्र (1924), पहाटेपूर्वींचा काळोख (1926), उमज पडेल तर (1939), एकटी (1945) या आपट्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा (1909), संधिकाल (1922), लांच्छित चंद्रमा (1925) आणि रजपूतांचा भीष्म (1949) या विशेष उल्लेखनीय आहेत. नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर प्रभातने ‘कुंकू’ चित्रपटाची निर्मिती करून जरठकुमारी विवाह ही त्या काळातील ज्वलंत समस्या चव्हाट्यावर मांडली. 14 नोव्हेंबर 1971 रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे त्यांचे निधन झाले. 


2000: गीतकार आणि सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांची पुण्यतिथी


योगेश्वर अभ्यंकर हे प्रसिद्ध गीतकार होते. त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1929 रोजी झाला.’शाळा सुटली पाटी फुटली, अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले’ यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली. सर्जनशील कवी म्हणून त्यांची ओळख होती. योगेश्वर अभ्यंकर यांचे 14 नोव्हेंबर 2000 रोजी निधन झाले.


2013: सचिन तेंडुलकरने खेळला शेवटचा कसोटी सामना 


सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (200 वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.