12th June Headlines : सोलापुरातील ऐतिहासिक हिंगुलांबिका देवीच्या ( हिंगलाज माता ) मंदिरात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याचसोबत आज संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान असून या दोन्ही पालख्या आज पुण्यात मुक्कामी असतील. यासह आज दिवसभरातील इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे, 


संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान 


तुकाराम महाराजांची पालखी सकाळी 7 वाजता आकुर्डीतील विठ्ठल मंदिरातून निघेल आणि पुण्यात नानापेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. तसचं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी 6 वाजता आळंदीतील गांधीवाड्यातून निघेल आणि पुण्यात भवानी पेठेत मुक्कामी असेल.


राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक 


राज्यात सध्या विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या तणावदर्शक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह विभागाचा आढावा घेण्याची शक्यता आहेत. अहमदनगर त्या पाठोपाठ कोल्हापूर या ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावल्यावरून वाद निर्माण झाला होता. वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या गृह विभागाची बैठक बोलावलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीला राज्यातील गृह विभागाचे अधिकारी त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस अधिकारी ही उपस्थित राहणार असल्याचे कळते


नवनीत राणा यांचं आज श्रमदान 


अमरावती शहरातील वडाळी तलावाचे सौदर्यीकरण आणि गाळ काढण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने अमृत 2 योजने अंतर्गत 22 कोटी रुपये मंजूर झाले. आज सकाळी 6.30 वाजता नवनीत राणा या वडाळी तलावाचे गाळ काढण्यासाठी श्रमदान करणार आहेत. सोबतच अमरावतीकरांनी या श्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.


भाजपचे राष्टीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय हे नाशिकमध्ये आज पत्रकार परिषद घेणार आहेत. पक्षाने नुकतीच केलेली नियुक्ती आणि केंद्र सरकार, राज्य सरकारची कामगिरी आणि इतर विषयावर बोलतील.


छगन भुजबळ आज येवला दौऱ्यावर असून ते येवल्यात सुरू असलेल्या शिवसृष्टीची व मुक्तिभूमीची पाहणी करणार आहेत. विविध विकास कामांचे उद्घाटन व प्रशासकीय संकुलांची पाहणी करत आढावा बैठक घेणार आहे.


धुळे - नांदेड येथील अक्षय भालेराव खून प्रकरणी विविध संघटनांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 


सोलापुरात हिंगुलांबिका देवीच्या नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना


सोलापुरातील ऐतिहासिक हिंगुलांबिका देवीच्या ( हिंगलाज माता ) मंदिरात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सोलापुरातील हे मंदिर जवळपास सव्वाशे वर्ष जुने आहे. या देवीची मूर्ती जीर्ण होत होती. त्यामुळे धुळ्याच्या संशोधन केंद्रात जुनी मूर्ती पाठविण्यात आली आहे. कर्नाटकातील गदग येथे विशिष्ट अशा पाषाण मधून नवी मूर्ती तयार करण्यात आली असून आज दुपारी 12 वाजता विधीवत प्रतिष्ठापना करण्यात येईल.