Maharashtra: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंविरोधात तक्रारींचा पाढा वाचत शिंदे-फडणवीस सरकारने जनतेच्या हिताची किती कामं केली याची यादीच वाचून दाखवली. आधीचं सरकार हे घरी बसून काम करणारं होतं, तर सध्याचं सरकार हे लोकहिताची कामं करणारं सरकार असल्याचं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला. तर आळंदीत वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवर देखील फडणवीसांनी भाष्य केलं आहे.


'उद्धव ठाकरेंचं सरकार भ्रष्टाचारी'


उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाने मतं मागितल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी विचारांना देखील लाथ मारली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्याचं फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे सरकार हे दुराचारी आणि भ्रष्टाचारी होतं, घरून काम करणारं होतं, हे सगळं एकनाथ शिंदेंना पटलं नाही म्हणून ते आमच्यासोबत आल्याचं फडणवीस म्हणाले. आमचा विचार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चरणी गहाण ठेवता येणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले आणि ते विरोधी पक्षात आले, त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं असल्याचं फडणवीस म्हणाले.


'आम्ही वेगाने निर्णय घेत आहोत'


आपण वेगाने निर्णय घेत आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लवकरच आम्ही शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देणार आहोत, असं फडणवीस म्हणाले. तर, जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा देखील सुरू केला असून पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना करण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस म्हणाले. सर्वांना घरं देण्याचा निर्णय आम्ही घेतला, आम्ही दिलेल्या एसटी सवलतीचा लाभ देखील 1 कोटी नागरिकांनी आतापर्यंत घेतल्याचं फडणवीस म्हणाले.


'जनतेसाठी कामं करतो, राष्ट्रवादी-काँग्रेससारखं पैशासाठी नाही'


प्रत्येक मतदार संघात आम्ही रोजगार मेळावा घेत आहोत आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार आम्ही देणार आहोत, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. जेव्हा जेव्हा सत्तेत येतो, तेव्हा जनतेसाठी कामं करतो, असंही ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी आणि पैशासाठी काम करतात, असं म्हणत फडणवीसांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे.


'काँग्रेस, राष्ट्रवादीला फक्त मतांसाठी ओबीसी हवे'


राष्ट्रवादीच्या मेळाव्यात दाखवलेल्या क्लिपवरुन देखील फडणवीसांनी ताशेरे ओढले. ओबीसी आरक्षण उद्धव ठाकरे सरकार असताना गेलं आणि आम्ही सत्तेत असताना आम्ही ओबीसी आरक्षण टिकवल्याचं फडणवीस म्हणाले. सत्तेत आल्यावर ओबीसी आरक्षण देईल, नाहीतर राजकीय संन्यास घेईल असं म्हंटलं होतं आणि त्याप्रमाणे सत्तेत आल्या आल्या ओबीसी आरक्षण आणल्याचं फडणवीस म्हणाले. तर, काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी म्हणजे ताटात लोणच्यासारखे पाहिजे, फक्त मतांसाठी दोन्हा पक्षांनी ओबीसी हवे असल्याचं म्हणत फडणवीसांनी निशाणा साधला. ओबीसींसाठी दोन्ही पक्षांनी काही केलं नसल्याचंही ते म्हणाले.


'आळंदीत फक्त बाचाबाची; वारकऱ्यांवर लाठीचार्ज नाही' 


आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे आणि अनेक नेत्यांनी या घटनेवर रोष व्यक्त केला, यावर देखील फडणवीसांनी भाष्य केलं आहे. आळंदीत वारकरी आणि पोलिसांत फक्त बाचाबाची झाली, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला नसल्याचं फडणवीस म्हणाले. मानाच्या दिंड्यांचे लोक आळंदीत पोहोचले होते, त्यावेळी इतर लोकांनी आत घुसण्याचा आग्रह केला आणि बॅरिकेटिंग तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाठीचार्ज झाला नसल्याचं फडणवीस म्हणाले.


'लाठीचार्ज झाला नसताना जनतेच्या भावना भडकवू नका'


वारकऱ्यांच्या सुरक्षेचा विषय असून त्यावर राजकारण करू नका, असं आवाहन फडणवीसांनी राजकीय पक्षांना केलं आहे. लाठीचार्ज झाला नसताना जनतेच्या भावना भडकवू नका, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा:


Jammu-Kashmir: 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी; मुख्यमंत्री शिंदेंची जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरांकडे मागणी