Nanded News Update  : नांदेड येथे आज जागतिक महिला दिनाच्या दिवशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी शिकवणी घेणाऱ्या  शिक्षकाने 12 वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून संशयित शिक्षक आरोपीला ताब्यात घेतले आहे. सतीश नरंगले असे या संशयित आरोपीचे नाव  आहे. 


नांदेड येथील यश नगर परिसरात आइडियल इंस्टिट्यूट सायन्स आणि मॅथेमॅटिक्स नावाची खासगी शिकवणी आहे. या शिकवणीसाठी अनेक विद्यार्थी येत असतात. सोमवारी रात्री आठच्या सुमारास शिकवणीसाठी आलेल्या एका 12 वर्षीय विद्यार्थिनीवर संशयीत आरोपी शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. या घटनेची माहिती पीडित मुलीने घरी आल्यानंतर आईला सांगितली. त्यानंतर पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी सतीश नरंगले  विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


गुन्हा दाखल केल्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. डीवायएसपी चंद्रसेन देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील गुरू शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेल्याचे परिसरातून बोलले जात आहे.


दरम्यान, आज महिला दिनाच्या दिवशीच हा घक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित संशयित शिक्षकावर याबाबात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही परिसरातील नागरिकांतून होत आहे. या घटनेने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.     


मत्वाच्या बातम्या