अकोला: आज 'जागतिक महिला दिवस'. महिला दिन म्हणजे आपल्या मातृशक्तीला पूजण्याचा अन् त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा उत्सव. आज स्त्रीशक्तीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या सामर्थ्याचा मोठा ठसा उमटवला आहे. आज कोणतंच क्षेत्र हे महिलांच्या गरुड भरारीपासून दूर राहिले नाही. महिलांनी स्वत:ची ईच्छाशक्ती आणि आत्मबळावर प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचे झेंडे अटकेपार रोवले आहेत. अकोला जिल्ह्यासाठी या जागतिक महिला दिनाचं महत्व काहीसं वेगळं आहे. कारण, अकोला जिल्ह्याचा कारभार नारीशक्तीच्या बळावर ताकदीनं पुढं चालला आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे, 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी'. या म्हणीचा प्रत्यय अकोला जिल्हा प्रशासनात काहीसा वेगळ्या पद्धतीनं येतो आहे. कारण, अकोला जिल्हा प्रशासनाची दोरी सर्वार्थाने महिलांच्या हाती आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अकोल्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अतिरिक्त पोलीस अधिक्षक, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांसह अनेक महत्वाच्या पदांवर महिला आहेत.
यांच्या हाती आहे प्रशासनाची 'दोरी'
अकोला जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी प्रमुख पदांवर महिला असण्याचा योग जुळून आला आहे. जिल्ह्यातील जवळपास 20 महत्वांच्या पदावर आज नारीशक्ती बसलेली आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा या जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. सात महिन्यांपूर्वी त्या या पदावर आल्या आहेत. याच निमा अरोरा आधी अकोला महापालिकेच्या आयुक्त होत्या. अकोला महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त असण्याचा बहुमानही त्यांच्याच नावाने आहे. निमा अरोरा यांची ओळख जिल्ह्याला एक संवेदनशील आणि करड्या शिस्तीच्या अधिकारी म्हणून आहे. अकोला महापालिकेत आयुक्त असतांना त्यांनी पालिका प्रशासनाला लावलेली शिस्त अकोलेकरांच्या चर्चेचा विषय बनली होती. जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी दबाव झुगारून लोकाभिमुख काम करणाऱ्या अधिकारी असा लौकीक प्राप्त केला आहे.
अकोल्यातील दुसऱ्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्ती म्हणजे महापालिका आयुक्त कविता द्विवेदी. द्विवेदी यांनी सात महिन्यांपूर्वी महापालिकेचा कारभार हाती घेतला. अकोला महापालिकेची आर्थिक परिस्थिती पार डबघाईस आलेली आहे. मात्र, द्विवेदी यांनी कारभार हाती घेतल्यावर महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर दिला. यामूळेच मागच्या काही महिन्यांपासून महापालिका कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळू लागलाय. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना सावकारांकडे हात पसरण्याची वेळ आयुक्त कविता द्विवेदी यांनी येऊ दिली नाही. यासोबत महापिलेकची मुदत आजच्या महिला दिनीच संपत असल्याने पुढचे काही महिने त्याच महापालिका प्रशासक असतील. पुनम कळंबे या अकोला महापालिकेच्या उपायुक्त आहेत. अकोला मनपाच्या शिक्षणाधिकारी पदावर शाहीन सुलताना व वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. अस्मिता पाठक या कामकाज सांभाळत आहेत.
अकोल्यात अतिरिक्त पोलीस अधिक्षक पदावरही मोनिका राऊत यांच्या रूपानं पहिल्यांदाच एका महिलेची नेमणूक झाली आहे. अकोला विभागाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून डॉ. जयश्री वसे-दुतोंडे या सक्षमपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि महापालिका. अकोला महापालिकेच्या महापौर म्हणून भाजपाच्या अर्चना मसने मागच्या वर्षांपासून कारभार पहात आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष या दोन्ही प्रमुख पदांवर पदांवर महिला आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा भोजने कारभार पाहत आहेत. तर उपाध्यक्षपदीही वंचितच्या सावित्री राठोड आहेत.
जिल्हा परिषदेच्या आर्थिक नाड्या हाती असलेल्या मुख्य लेखाधिकारी म्हणून विद्या पवार काम पहात आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून वैशाली ठग कार्यरत आहेत. यासोबतच डॅशिंग आणि उपक्रमशील शिक्षणाधिकारी अशी ओळख असलेल्या डॉ. सुचिता पाटेकर या माध्यमिक शिक्षण विभागाचा गाडा हाकत आहेत. संचयिका सरोदे या जिल्हा परिषदेत लेखा अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.
अकोल्यातील आरोग्याची संपुर्ण जबाबदारी नारीशक्तीच्या हातीच आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून डॉ. मिनाक्षी गजभिये काम पाहत आहेत. यासोबतच जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या अधिक्षिका म्हणून डॉ. आरती कुलवाल जबाबदारी सांभाळत आहेत. तर जिल्हा शल्य चिकीत्सक असलेल्या डॉ. वंदना वसो यांची नुकतीच बदली झाल्यावर त्यांच्या जागेवर डॉ. तरंगतुषार वारे या महिला अधिकाऱ्यांचीच या पदावर वर्णी लागली आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून नम्रता टाले या कार्यरत आहेत. याशिवाय या पदांव्यतिरिक्तही जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा सातत्याने उमटवित आहेत.
जिल्ह्यातून विधीमंडळात महिलांचा टक्का नगण्य
अकोला जिल्हा हा संत गाडगेबाबांची कर्मभूमी. मात्र, शिक्षणासोबतच स्त्री-पुरूष समानतेची शिकवण देणाऱ्या अकोल्यातून संसदेत आतापर्यंत एकही महिला खासदार म्हणून जावू शकली नाही. यासोबतच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर जिल्ह्यातील मुर्तिजापूर मतदारसंघातून प्रतिभाताई तिडके या एकदा आमदार झाल्यात. तर कुसुमताई कोरपे यांना याच मतदारसंघातून दोनदा आमदारकीची संधी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या कोणत्याही मतदारसंघातून महिलेला प्रतिनिधीत्व मिळू शकलं नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुर्तिजापूर मतदारसंघातून वंचितच्या प्रतिभा अवचार अवघ्या 1910 मतांनी पराभव झाला. 1972 नंतर जिल्ह्यात एकही महिला आमदार होऊ शकली नाही. तर 1980 मध्ये भाजपच्या डॉ. प्रमिला टोपले यांचा अपवाद वगळता एकाही प्रमुख राजकीय पक्षानं लोकसभेत महिलेला उमेदवारी दिलेली नाही. अकोला जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही अद्यापपर्यंत एकाही महिलेनं भूषविलेलं नाही. यासोबतच अकोल्याच्या पोलीस अधिक्षक पदावरही अद्यापपर्यंत कोणत्या महिलेला कामाची संधी मिळालेली नाही.
8 मार्चचा एक दिवस 'जागतिक महिला दिवस' साजरा केल्यावर इतर दिवसांचं काय? इतर प्रत्येक दिवशीही हाच सन्मान नारीशक्तीला दिला गेला तरच या दिवसाचं फलित खऱ्या अर्थानं झालं असं म्हणता येईल. सर्व मातृशक्तीला 'एबीपी माझा'कडून 'जागतिक महिला दिना'च्या शुभेच्छा अन सलाम.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha