12th January Headlines: आज विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची लगबग असणार आहे. तर, आज जिजाऊ जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्यावतीने आज वार्षिक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी महत्त्वाची माहिती भारतीय लष्कराकडून दिली जाण्याची शक्यता आहे. 


> जिजाऊ जयंती निमित्ताने कार्यक्रम: 


सिंदखेड राजा येथे 425 वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा जिजाऊ स्ष्टीत होणार आहे. सकाळी 6 वाजता महापूजा होणार आहे. सकाळी 7 वाजता दिंडी निघणार आहे. सकाळी 9 वाजता शिवधर्म ध्वजारोहण होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत सास्कृतिक कार्यक्रम होणार आहे. 



> विधान परिषद उमेदवारी अर्ज


मुंबई – विधान परिषदेच्या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. भाजप शिंदे गटाच्या सोबत बच्चू कडू ही जागेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोण कोण उमेदवारी अर्ज भरणार हे पहाण महत्वाचं राहील. 


नाशिक – नाशिक पदवीधर मतदारसंघाचा सस्पेंस कायम आहे. आज सुधीर तांबे दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात आहे. भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत उशिरा नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.


नागपूर – विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज भाजप प्रणित आणि महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप नेते सोबत उपस्थित राहण्याची शक्यता  आहे. 


अमरावती – अमरावती विभाग पदवीधर निवडणूकीत महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवणार असून आज काँग्रेसचे उमेदवार धिरज लिंगाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाना पटोले येणार आहेत
 
मुंबई:


- राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज निकाल अपेक्षित याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावण्याच्या निर्णयाला त्यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलेलं आहे. त्यावरील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी गेल्या आठवड्यात आपला निकाल राखून ठेवला. त्याबाबत आज निकाल येण्याची शक्यता आहे.
 
- टॉप्स सिक्युरीटज प्रकरणी मुंबई पोलिसांनी सादर केलेला सी समरी अहवाल स्वीकारू नये यासाठी ईडीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 12 जानेवारीपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अमित चांडोले आणि एम शशिधरन यांना हायकोर्टानं जामीन दिला आहे. अमित चांदोले हे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय आहेत.
 
 पुणे


- महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे. अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या होणार आहेत.  


- पिंपरी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता आहे. 


सांगली: 


- विटा मध्ये नेचर केअर फर्टिलायझर्सचे संस्थापक, मातीचे मोल जपणारे तपस्वी जयंत वामन तथा बाबा बर्वे यांच्या कृषी क्षेत्रातील अनमोल कामगिरीबद्दल नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वतीने कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याला माजी  वैद्यकीय मंत्री अमित देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, सुधीर गाडगीळ, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या उपस्थितीत नेचर केयर फर्टीलायझर्स प्रा. लि. कंपनीचा रौप्य महोत्सव आणि कृतज्ञता सोहळा साजरा होणार आहे. 


रत्नागिरी:


चिपळूण (रत्नागिरी) – शिवसेना ठाकरे गटाचे नेते  आमदार भास्कर जाधवांच्या बालेकिल्ल्यात खेड-गुहागर मतदारसंघात नांदगाव येथे रामदास कदमांचा पहिला मेळावा आज होणार आहे. 
 
अहमदनगर:


- विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यावतीने आज शहरातून शौर्य यात्रा काढली जाणार आहे


शिर्डी – नाशिक पदवीधर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता संगमनेर मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास नाशिकला जाणार आहे. या कार्यक्रमात सत्यजित तांबे देखील येणार असल्याची माहिती आहे.
 
नागपूर


- ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठानाच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक आणि महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे उपस्थित राहणार आहेत. 


यवतमाळ 


- अरुणावती प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसह आर्णी तालुक्यातील 200 ते 300 शेतकरी आज अरुणावती प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
 
चंद्रपूर 


- आजपासून ब्रम्हपुरी महोत्सवाला सुरूवात होणार आहे. 12 ते 15 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची संध्याकाळी 5 वाजता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे दर वर्षी या महोत्सवात कला, संस्कृती आणि क्रिडा संबंधीत प्रकारांचे आयोजन केलं जातं. आज कृषी महोत्सवाचे देखील उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला सोनू सूद, प्राजक्ता माळी आणि असराणी देखील उपस्थित राहणार आहेत.