मुंबई : राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरूवात होत आहे. राज्यभरातून सुमारे 15 लाख 5 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6 टक्क्यांनी वाढली आहे.


राज्यातील एकूण 9 हजार 143 ज्युनिअर कॉलेजातील विद्यार्थी ही परीक्षा देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील 2 हजार 710 केंद्रांवर ही परीक्षा होईल.

या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात सात भरारी पथक नेमण्यात आलेत. तर कॉपी रोखण्यासाठी एकूण 252 पथकं सज्ज आहेत.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन

  • मुंबई 0२२- २७८९३७५६,

  • पुणे 0२0- ६५२९२३१६,

  • नागपूर 0७१२- २५५३५0७,

  • औरंगाबाद 0२४0- २३३४२२८,

  • नाशिक 0२५३- २५९२१४३,

  • कोल्हापूर 0२३१- २६९६१0३,

  • अमरावती 0७२१- २६६२६0८,

  • लातूर 0२३८२- २२८५७0,

  • कोकण 0२३५२- २३१२५0


हॉलतिकीट हरवल्यास काय कराल?

प्रवेशपत्र (हॉल तिकीट) हरवल्यास किंवा त्यात त्रुटी असल्यास विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती निर्माण होते. पण काळजी करण्याचं कारण नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत किंवा केंद्र प्रमुखांशी संपर्क साधल्यास सुधारित प्रवेशपत्र देण्यात येईल. तरीही अडचण आल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल.

शाखानिहाय विद्यार्थी

विज्ञान-5,59,423

कला-5,09,124

वाणिज्य-3,73,870

किमान कौशल्य-62,948

परीक्षा केंद्रांवर मोबाईलला बंदी

परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मोबाईल आणण्याची परवानगी नाही. विद्यार्थ्यांजवळ फोन आढळल्यास जप्त करण्यात येईल किंवा परीक्षा केंद्राबाहेर स्वत:च्या जबाबदारीवर ठेवावा लागेल. मोबाईल हरवला, तर परीक्षा केंद्र त्याला जबाबदार राहणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईल आणून नये, असं आवाहन शिक्षण मंडळाने केलं आहे.

विद्यार्थ्यांनी किमान तासभर आधीच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावं. एखाद्या केंद्रावर बैठक व्यवस्थेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता बघता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अगोदरच हजर राहावं, त्यामुळे ऐनवेळी गोंधळ निर्माण होणार नाही, असं आवाहन शिक्षण मंडळाने केलं आहे.