सातारा : सैनिकांच्या पत्नींबद्दल अपशब्द काढणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. 'आमदार असू दे नाहीतर कोणी, त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार' अशा भाषेत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही परिचारक यांच्यावर सडकून टीका केली आहे.


देशाचे रक्षण करणाऱ्या बदल असं बोलणं अशोभनीय आहे, त्या आमदाराला मी ठोकून काढणार, अशी भूमिका साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली आहे.

'लाज वाटायला पाहिजे. कसं बोलतात, काय बोलतात, कधी बोलायचं. जे सैनिक संपूर्ण आयुष्याची आहुती देतात आणि संसार सोडतात. त्यांच्या बायकांना पण माहित नाही, तो परत येईल की नाही. जे संरक्षण करतात, त्यांच्याबद्दल असं बोलणं अशोभनीय आहे. खरंच काय बोलायचं. माझ्या तर बुद्धीच्या पलिकडे आहे. त्याला तर.. शप्पथ सांगतो.. आमदार असूदे... चुकून आलाय आत्ता निवडून.. त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार' असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

आजी माजी सैनिकांच्या संघटनेच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनाही निवेदन देण्यात आलं.

काय आहे प्रकरण:

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत विरोधकांवर टीका करण्याच्या नादात भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला होता.

"पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो.” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.