12 April In History: प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. प्रत्येक दिवशी काही घडामोडी घडलेल्या असतात. त्याचा परिणाम वर्तमानासोबत भविष्यावरही होत असतो. आज 12 एप्रिल रोजीदेखील (12 April In History) अशा काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. टीम इंडियाच्या पहिल्या कसोटी विजयाचे शिल्पकार विनू मांकड यांचा आज जन्म दिवस आहे. तर, भारतातील पथनाट्य चळवळीचे प्रमुख प्रणेते समजले जाणारे अभिनेते-दिग्दर्शक-लेखक सफदर हाश्मी यांचाही आज जन्मदिवस आहे. शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण करणारी सेबी या संघटनेची स्थापना आजच्या दिवशी झाली. जाणून घ्या आज इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी.


1910 : सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे (पुरुषोत्तम भास्कर भावे) यांचा जन्म. 


पुरुषोत्तम भास्कर भावे हे मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. पु.भा. भावे यांनी कादंबऱ्या, नाटक, लेखसंग्रह आणि प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. अकुलिना, अडीच अक्षरे, दर्शन, दोन भिंती इ. त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत.


1917: भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे शिल्पकार विनू मांकड यांचा जन्म


मूळवंतराय हिम्मतलाल मांकड म्हणजेच विनू माकंड यांचा आज जन्म दिवस. जामनगरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी 233 प्रथम श्रेणीचे सामने खेळले. तर, 44 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. कसोटी सामन्यात 31.47 च्या सरासरीने 2109 धावा केल्यात. त्यात पाच शतके आणि सहा अर्ध शतकांचा समावेश आहे. 231 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांनी गोलंदाजीत कमाल दाखवत 162 बळी घेतले. 52 धावात 8 गडी ही त्यांची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली. 


भारताला 1932 साली कसोटी क्रिकेटसाठीची मान्यता मिळूनही संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशक वाट पाहावी लागली होती. विजय हजारे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1952 साली इंग्लंडवर एक डाव आणि आठ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड यांनी या कसोटीत इंग्लंडचे 12 गडी बाद केले होते.


1943 : ज्येष्ठ भाजपा नेत्या सुमित्रा महाजन यांचा जन्म.


सुमित्रा महाजन ह्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या आहेत. त्या 2014 ते 2019 या काळात लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. त्यांना 2021 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. 


1954: पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचा जन्म


भारतातील पथनाट्य चळवळीला आयाम देणारे  अभिनेते, दिग्दर्शक, लेखक-कवी सफदर हाश्मी यांचा जन्म. सफदर हाश्मी हे कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. विद्यार्थी जीवनात त्यांनी स्टु़डंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेचे सक्रीय सभासद होते. 'इप्टा'मधून बाहेर पडत त्यांनी दिल्लीत 1973 मध्ये जन नाट्य मंचची (जनम) स्थापना केली. 


'जनम'चा सीटू या डाव्या विचारांच्या कामगार संघटनेशी घनिष्ट संबंध होता. याशिवाय त्यांनी लोकशाहीवादी विद्यार्थी, महिला, तरुण, शेतकरी इत्यादींच्या चळवळींमध्येही सक्रिय भूमिका बजावली. आणीबाणी लागू झाल्यानंतर सफदर हाश्मी हे गढवाल, काश्मीर येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर पुढे दिल्लीच्या विद्यापीठात इंग्रजी साहित्य विषयाचे लेक्चरर होते.  आणीबाणीनंतर, सफदर पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले. 'जनम' ही भारतातील एक महत्त्वाची पथनाट्य संस्था म्हणून उदयास आली. 


दोन लाख कामगारांच्या प्रचंड मेळाव्यासमोर 'मशीन' हे नवे पथनाट्य सादर करण्यात आले. यानंतर आणखी बरीच नाटके आली, ज्यात शेतकऱ्यांची अस्वस्थता दाखवणारे 'गाव से शहर तक' हे नाटक, जातीयवादी फॅसिझमचे चित्रण असणारे नाटक , बेरोजगारीवर आधारीत 'तीन करोड', घरगुती हिंसाचारावर आधारीत 'औरत' आदी पथनाटके गाजली. सफदरने दूरदर्शनसाठी अनेक माहितीपट आणि 'खिलती कलियों का' या मालिकेची निर्मितीही केली. त्यांनी लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली आणि भारतीय रंगभूमीच्या समीक्षेतही योगदान दिले.
 
साहिबाबाद येथे 1 जानेवारी 1989 मध्ये पथनाट्य सादर करत असताना गुंडानी जन नाट्य मंचच्या कलाकारांवर हल्ला केला. आपल्या सहकाऱ्यांना वाचवताना सफदर हाश्मी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर 2 जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते फक्त 34 वर्षांचे होते.


1961 : रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर


युरी अलेक्सेइविच गागारिन हे सोवियेत संघाचे अंतराळयात्री होते. एप्रिल 12, 1961 रोजी गागारिन अंतराळात जाणारे सर्वप्रथम व्यक्ती ठरले. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने 89 तास 34 मिनिटे त्यांनी भ्रमण केले. या पराक्रमाबद्दल त्यांना अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. त्यात ऑनर ऑफ लेनिन आणि सोवियत संघाचा नायक या पुरस्कारांचाही समावेश आहे.


1992 : SEBI ची स्थापना


सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची स्थापना सर्वप्रथम 1988 मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी वैधानिक संस्था म्हणून केली गेली. 12 एप्रिल 1992 रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा 1992 संमत केल्याने वैधानिक अधिकार देण्यात आले. सिक्युरिटीज एक्सचेंजच्या कायद्यांद्वारे मंजूर करणे. आर्थिक मध्यस्थांच्या खात्यांच्या पुस्तकांची तपासणी करणे. कार्यकारी प्रमुख म्हणून गैरव्यवहारांची तपासणी करून त्यावर कारवाई करणे इ. सेबीची मुख्य कार्य आहेत.