Monsoon 2023: स्कायमेट वेदर या खासगी हवामान संस्थेचा दावा भारत सरकारने फेटाळला आहे. काल स्कायमेट हवामानाने असा दावा केला होता की , भारतात या मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, जो आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने पूर्णपणे नाकारला आहे. यंदा देशात मान्सून कसा असणार आहे? याबाबत भारतीय हवामान विभागाचा पहिला अंदाज आला आहे. हा अंदाज स्कायमेट या संस्थेच्या अंदाजाच्या विरुद्ध आहे.


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन म्हणाले की, नैऋत्य मान्सून दरम्यान भारतात सामान्य पाऊस पडेल. मंत्रालयाचे म्हणणे आहे की ,यावर्षी दक्षिण भारत, पूर्व मध्य भारत, पूर्व भारत, ईशान्य भारत आणि उत्तर-पश्चिम भागात सामान्य पाऊस पडेल. तथापि, मंत्रालयाचे म्हणणे आहे की ईशान्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारतातील काही भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल. यासह पश्चिम मध्य भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे.


'स्कायमेट'चा काय होता दावा?


स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने सोमवारी सांगितले होते की, भारतात यावर्षी पावसाची शक्यता सामान्यपेक्षा कमी आहे. 'एल निना' संपल्याने दुष्काळ पडण्याची शक्यता 20 टक्के आहे. तसेच एल निनो देखील वर्चस्व गाजवू शकतो. कमी पावसामुळे यंदा पिकांवर संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती करणे महागात पडू शकते.


20 टक्के दुष्काळ पडण्याची होती भीती


'स्कायमेट'च्या मते, यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांत 868.6 मिमी पावसाचा एलपीए 94 टक्के असेल. स्कायमेटने म्हटले आहे की, देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची कमतरता असेल. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही जुलै आणि ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडेल. उत्तर भारतात, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये वर्षाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटनेही २० टक्के दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली होती.


मात्र भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी स्कायमेट चा दावा फेटाळत देशातील पावसाविषयी यंदा पहिला अंदाज वर्तविला आहे. पृथ्वी मंत्रालयाच्या अंदाजामुळे मात्र देशातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. 


देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज


यावर्षी देशात सरासरीच्या 96 टक्के पाऊस (Rain) होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे. देशात यंदा सामान्य पाऊस राहणार आहे. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दीर्घकालीन अंदाज आहे.