मुंबई: विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यातील 12,653 शिक्षकांचे आधार कार्ड अवैध असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना 30 एप्रिल पर्यंत सर्व शिक्षकांचे आधार कार्ड यू-डायस प्रणालीमध्ये व्हॅलिड (वैध) करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. राज्यभरातील शिक्षक सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड यू डायस प्लस या केंद्र सरकारच्या प्रणालीमध्ये अपडेट करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अजूनही राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे अपडेशनचे काम बाकी असल्याची माहिती आहे.
एकीकडे विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांचे आधार कार्ड या प्रणालीमध्ये अवैध असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील साडे बारा हजाराच्यावर शिक्षकांचे स्वतःचे आधारकार्डच या प्रणालीद्वारे व्हॅलिड नसल्याचं समोर आलं आहे. मुंबई, पुण्यात या शिक्षकांची संख्या चौदाशेंच्यावर आहे.
या आधार कार्डच्या अपडेटवरच 2022- 23 ची संच मान्यता ठरणार असून विद्यार्थ्यांच्या संख्येवरूनच राज्यातील शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे आधार कार्ड व्हॅलिडेट करणे आणि माहिती भरणे सक्तीचे आहे.अन्यथा राज्यातील शिक्षकांच्या यादीमध्ये अशा शिक्षकांना वैध ठरवले जाणार नाही.
पुण्यामध्ये 1402 शिक्षक, मुंबईतील बीएसमी शाळेतील मिळून 1455 शिक्षक, ठाण्यात 1322, सोलापूर 617 नाशिक 598,नागपूर 827, पालघर 565, संभाजीनगर 587 शिक्षक असे राज्यभरातील 12653 शिक्षक या यादीमध्ये समोर आले आहेत.
विदर्भात जवळपास दोन हजार शिक्षकांचे आधार अपडेट नाही
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची संचमान्यता मिळविण्यासाठी त्यांचं आधार कार्ड यू-डायस या सॉफ्टवेयर सोबत लिंक करणे सरकारने अनिवार्य केलं आहे. मात्र ही जबाबदारी ज्या शिक्षकांवर आहे त्या शिक्षकांचेच आधार कार्ड या सॉफ्टवेयर मध्ये अपडेट नसल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भातील तब्बल 1 हजार 889 शिक्षकांचे आधार कार्ड अपडेट नसून यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 247 शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांना 30 एप्रिलपर्यंत आधार कार्ड अपडेट करण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांचे आधार कार्ड का अपडेट नाही याबाबत प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही.
Beed Teachers : ... तर शिक्षकांचे आधार कार्ड बोगस असल्याचं जाहीर करणार, शिक्षण आयुक्तांचा आदेश
बीड जिल्ह्यातील 165 शिक्षकांच्या आधार कार्ड लिंक होत नसल्याने त्यांना 30 एप्रिलपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे आणि त्यानंतरही आधार कार्ड लिंक न झाल्यास या शिक्षकांचे आधार कार्ड बोगस घोषित करण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यातच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे आधार लिंक करण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील 165 शिक्षकांचे आधार शाळेच्या वेबसाईटवर लिंक होत नसल्यामुळे हे आधारे कार्ड 30 एप्रिल पर्यंत लिंक करणे बंधनकारक करण्यात आल आहे. ते न झाल्यास या शिक्षकांचे आधार कार्ड बोगस घोषित करण्यात येणार असल्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत.