11th September Headlines : आज श्रावणातील शेवटचा सोमवार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकराचे दर्शन घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील फिश थीम पार्क प्रकल्पाची आजपासून सुरुवात होणार आहे. कोरोना काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांची चौकशी आज होणार आहे.
मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षाकडून शरद पवार गटाकडून राजेश टोपे आणि ठाकरे गटाकडून अंबादास दानवे उपस्थित राहणार आहेत.
ठाणे बंदची हाक
सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. या ठाणे बंदला महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी तसेच मनसेने देखील पाठिंबा दर्शवला आहे.
एसटी कामगार संघटनांचे एकदिवसीय उपोषण
एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने एसटी कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. आजपासून एसटी कामगार संघटना आझाद मैदानात एकदिवसीय उपोषण करणार आहेत. तर याच मुद्द्यावर सह्याद्री अतिथीगृहावर बैठक देखील पार पडणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी
खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देण्याऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
आरे कॉलनीतील तीन तलावांत गणेश मूर्तींचे विसर्जन रोखावं. वसाहतीत आणि वसाहतीबाहेर मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणी करत वनशक्ती या सेवाभावी संस्थेनं जनहित याचिका दाखल केली आहे, त्या याचिकेवर सुनावणी.
सिंधुदुर्गातील फिश थीम पार्क उद्घाटन
भारतातील पहिलं फिश थीम पार्क सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील केसरी गावात उभारण्यात आले आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे पाहायला मिळणार आहेत. या प्रकल्पाचा आजपासून शुभारंभ होणार आहे.
भारत आणि पाकिस्तानचा अपूर्ण सामना खेळवला जाणार
रविवार (10 सप्टेंबर) रोजी भारत आणि पाकिस्तान मधील दुसरा सामना देखील पावसामुळे अपूर्ण राहिला. तोच सामना आज म्हणजेच राखीव दिवशी खेळवण्यात आला. आज हा सामना जिथे थांबला तिथूनच सुरु करण्यात येईल.
आज शेवटचा श्रावणी सोमवार
आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भीमाशंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतील. तर अनेक नेते आज भीमाशंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.