ठाणे : जालना येथे मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठीहल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्यावतीने आज, 11 सप्टेंबर रोजी 'ठाणे बंद' पुकारण्यात आला आहे. या बंदला सर्व मराठा संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. रॅली, रास्ता रोको न करता अहिंसक मार्गाने बंद यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजातील समन्वयकांनी केला आहे. तर या बंदच्या आडून शहरात कायदा - सुव्यस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे शांततेत बंद यशस्वी केला जाईल, असे प्रतिपादन सकल मराठा समाज समन्वयकांनी केले आहे.
मराठा संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दिला पाठिंबा
जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये अनेक जण जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील अनेक भागात बंद पुकारण्यात आला होता. त्याच पद्धतीने शांततेत सोमवारी ठाणे बंदचा निर्णय सकल मराठा मोर्चाने घेतला. जात, धर्म पक्ष आणि नेता बाजूला ठेवून सर्वांनी या बंदला प्रतिसाद देत हक्काच्या लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन मराठा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्यांनी करताच दोन दिवसांपूर्वी प्रमुख सर्वपक्षीय नेते आणि मराठा संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला. हा बंद सर्व स्तरावर यशस्वी करण्यासाठी मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या. ठाणे पालिका क्षेत्रात हा बंद केला जाणार असून कोणत्याही स्वरूपात बंद काळात हिंसा केली जाणार नसून नागरिकांनाही सनदशीर मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली जाणार असल्याचे भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश कदम यांनी सांगितले.
कशाप्रकारे असणार पोलीस बंदोबस्त
बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले आहेत. शहरात 45 निरीक्षक, 160 सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, सुमारे 1 हजार 300 कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या, राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रास्ता रोको टाळण्यासाठी महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी निवासस्थान ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शनजवळ असल्याने बंदच्या पार्श्वभूमीवर येथे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
नागरिकांवर बंदमुळे परिणाम?
सरकारी आणि खासगी कार्यालये सुरू असल्याने नोकरदारांना सेवा देण्यासाठी ठाणे परिवहन सेवा सुरु ठेवली जाणार आहे. सकाळी बंदची तीव्रता पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली. तर रिक्षा संघटनांनी बंदमध्ये थेट सहभागी होणे टाळले असून बंदच्या परिस्थितीप्रमाणे रिक्षा चालक निर्णय घेतील, असे रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.