पालघर : पालघर जिल्हा निर्मिती होऊन चार वर्षे उलटली, परंतु कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या गेल्या असल्या तरी बालमृत्यूचे ग्रहण या जिल्ह्याला अजूनही लागले आहे. 2017-18 मध्ये पालघरमध्ये तब्बल 469 बालमृत्यू झाले असून, चालू वर्षात गेल्या सात महिन्यात जुलैपर्यंत 119 बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यु झाले आहेत.


नुकतेच वाडा तालुक्यातील गूंज आश्रमशाळेतील आठवीत शिकणाऱ्या प्रमिला शांताराम पागी या विद्यार्थिनीचा भुकेमुळे (कुपोषणाने) उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमिलाचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी म्हणजे 2 पर्यंत गेल्याने तिचा मृत्यू झाला.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कुपोषण आणि विविध आजारांमुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जिल्हा स्थापनेपासून हे प्रमाण कमी व्हावे, यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या, तरी पहिल्या दोन वर्षात अडीच टक्के इतक्या प्रमाणात बालमृत्यू झाले. त्यानंतर गरोदर, स्तनदा माता, किशोरवयीन मुली व नवजात बालकांसाठी पोषण आहार, आरोग्य तपासणी यासाठी योजना आखण्यात येऊन त्यावर देखरेख ठेवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विशेष टास्क फोर्सची स्थापनाही झाली. मात्र बालमृत्यूचे प्रमाणात अजूनही लक्षणीय राहिल्याने शासनाला पोषण आहार, आरोग्य सेवांसोबत स्थानिक पातळीवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे.

2014-15 मध्ये 626 बालमृत्यूची नोंद झाली असताना, 2015-16 मध्ये 565, 2016-17 मध्ये 557, सन 2017-18 मध्ये 469 इतक्या बालमृत्यूची नोंद झाली आहे. या सोबत प्रसूतीच्या वेळी सन 2014-15 मध्ये 16, सन 2015-16 मध्ये 15, सन 2016-17 मध्ये 18, सन 2017- 18 मध्ये 19 मातांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण डहाणू आणि जव्हार तालुक्यात अधिक प्रणाम असून मोखाडा, पालघर, तलासरी, विक्रमगड आणि वाडा तालुक्यात देखील लक्षणीय आहे.

आकडेवारी :

साल 2014-15 

बालमृत्यू - 626

एकूण जन्म – 25474

साल 2015-16 

बालमृत्यू - 565

एकूण जन्म – 24716

साल 2016-17 

बालमृत्यू - 557

एकूण जन्म – 27750

साल 2017-18 

बालमृत्यू - 469

एकूण जन्म – 28462