औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना औरंगाबादमध्ये वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. राज ठाकरेंनीही पोलिसांकडून वाहतुकीसंदर्भातील उपक्रमांची माहिती अगदी मन लावून ऐकली.

नेमकं काय झालं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद-धुळे दरम्यान प्रवास करत होते. त्यावेळी आलापूर-खुलताबाद येथे महामार्ग पोलीस मदत केंद्राजवळ थांबून सीटबेल्ट, हेल्मेट वापरणे याबाबत पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस निरीक्षक सुरेश वानखेडे यांच्याकडून माहिती घेतली.

यावेळी, महामार्ग पोलिसांनी राज्यामध्ये करत असलेल्या या प्रबोधनात्मक, तसेच सामाजिक उपक्रमाबद्दलही राज ठाकरेंना सविस्तर माहिती दिली.



राज ठाकरे यांनी या उपक्रमांची माहिती घेऊन कर्मचाऱ्यांचे कौतुक करत, समाधानही व्यक्त केले आणि  महामार्ग पोलिसांचे अभिनंदन केले.

राज ठाकरे सध्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सकाळीच ते औरंगाबादहून धुळ्याला गेले.