11th January Headlines: राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गट आणि भाजपकडून उमेदवार निश्चित केले जात असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत समन्वय दिसून येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्रितपणे सामोरे जाणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. त्याशिवाय अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शिझानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
मुंबई:
- मुंबईसह आसपासच्या परिसरातील उघडी मॅनहोल आणि रस्त्यावरचे खड्डे यांसदर्भात हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. वारंवार निर्देश देऊनही पालिका प्रशासनाकडून याबाबत होणाऱ्या हलगर्जीपणाबाबत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.
- जॉन्सन बेबी पावडरबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी. एफडीएनं बेबी पावडरच्या वितरणावर लावलेल्या बंदीबाबत हायकोर्ट देणार निर्देश. नव्या नियमावलीनुसार राज्य सरकार पुन्हा नव्यानं करणार का चाचणी?
- 30 जानेवारीला पार पडणाऱ्या विधान परिषद निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरची तारीख 12 जानेवारी आहे. यासाठी केवळ 2 दिवस बाकी असतानाच अजुनही महाविकास आघाडीचे नागपूर शिक्षक मतदार संघाचा आणि अमरावती पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवार ठरलेला नाही. आज महाविकास आघाडीची याबाबत बैठक पार पडणार असून उमेदवाराची घोषणा होईल. मात्र, महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.
- विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 30 जानेवारीला निवडणूक होत आहे. विधान भवनात महाविकास आघाडी आणि भाजपा शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
सोलापूर:
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेच्या धार्मिक कार्यास रुढी परंपरेप्रमाणे आजपासून सुरूवात होणार आहे. सिध्दरामेश्वरांच्या हातातील योगदंड उत्तर कसबा येथील कै. शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून मठपती (स्वामी) हा योगदंड शुक्रवार पेठ येथील कै. रामचंद्रप्पा शेठे यांच्या वाड्यात घेऊन जातात. त्याठिकाणी मानकरी हिरेहब्बू आल्यानंतर त्या योगदंडाची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर होमहवन आणि अॅड. मिलिंद थोबडे हे पादपूजा करतात. त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम होतो. तेव्हापासून यात्रेच्या धार्मिक विधींना सुरुवात होते.
पुणे:
- 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्र केसरीच्या मुख्य स्पर्धेसाठी वजनी गटातील लढती ठरणार आहेत.
- येरवडा कारागृहातील कैद्यांकडून संक्रातीच्या निमित्ताने तयार केलेल्या वस्तू आणि पदार्थांचे विक्री केंद्र सुरु होणार आहे.
- 33 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस खेळांच्या उद्घाटनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.
- पंधरा महिन्यानंतर पिंपरी चिंचवडमधील मोशी टोल नाका पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाने 8 ऑक्टोबर 2021ला टोल नाका बंद केल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यानंतर हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरण झाला आणि त्यांना 5 जानेवारी पासून पुन्हा टोल वसुलण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पण स्थानिकांचा विरोध पाहता अद्याप टोल आकारणी सुरू नाही. ती उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
सांगली:
मिरजेत ब्रह्मानंद पडळकर यांनी केलेल्या पाडापाडीच्या जागेच्या ताब्यावरुन या जागेचे मालक आणि वहिवाटदार कब्जेदारांची दुसरी सुनावणी तालुका दंडाधिकारी यांच्याकडे मिरज तहसीलदार कार्यालयात होणार आहे. मागील सुनावणीत गाळेधारक वकिलांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसाची मुदत मागितली होती..त्यामुळे आजच्या सुनावणीत निकाल लागतो काय हे पहावे लागेल.
नागपूर:
- नागपुरात संत सद्गुरु दास महाराज यांना आज धर्मभास्कर ही उपाधी प्रदान केली जाणार असून नागपुरात होणाऱ्या या सोहळ्याला संकेश्वर पीठचे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद विद्यानरसिंह भारती यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक डॉ मोहन भागवत हेही उपस्थित राहणार आहेत.
- शेतकरी नेते राकेश टीकेत यांचा नागपूरचा एकदिवशीय दौरा आहे. देशपांडे सभागृहात शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहे.
वाशिम:
जैन समाजाच्या आस्थेचे केंद्र झारखंड मधील सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणुन घोषित करण्या विरोधात कारंजा येथे आज सकल जैन समाजाकडून मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
लातूर:
राज्य शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, मानवलोक संस्था, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय आणि मांजरा नदी जलसंवाद यात्रा समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त चला जाणू या नदीला अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत 11 ते 18 जानेवारी या कालावधीत मांजरा नदी जल संवाद यात्रा निघणार आहे. या यात्रेचे उद्घाटन राजेंद्र सिंह यांच्या हस्ते होणार आहे.