Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे सरकारनं आज सभागृहात बाजी मारली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीची लढाई शिंदे-फडणवीस सरकारनं जिंकली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवला. पण आज त्यांची खरी कसोटी होती. बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच विविध मुद्दे देखील मांडले. पाहुयात फडणवीस यांच्या भाषणातील 10 मुद्दे.



देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील 10 मुद्दे



  • एकनाथ शिंदे हे सेना-भाजप युतीचे मुख्यमंत्री झाले आहेत. ते एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून चांगल काम करतील असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा त्यांचा अद्भूत प्रवास असल्याचे ते म्हणाले.

  • एकनाथ शिंदे हे एक कट्टर शिवसैनिक आहेत. कर्मावर निष्ठा असणारे कुशल संघटक, जनतेचे सेवेकरी आहेत. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रभावीत होऊन ते राजकारण आले. त्यांच्या शिकवणीप्रमाणे काम करत आहेत.  

  • शरद पवार यांचे देखील मी आभार मानतो. कारण त्यांनी संघाची भूमिका, संघाची शिस्त याबद्दल वक्तव्य केलं. तसेच राज ठाकरे यांनीही पत्र पाठवून अभिनंदन केल्याबद्दल फडणवीस यांनी आभार मानले. त्यांनी खूप सुंदर वापरले आहेत. 

  • एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी मी पूर्ण क्षमतेनं उभा आहे. त्यांच्यात माझ्यात कधीही दुरावा दिसणार नाही. कुठेही कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही असेही फडणवीस म्हणाले.

  • मी पुन्हा येईल असं म्हणालो होतो, त्यानंतर अनेकांनी माझी टिंगल टवाळी केली. पण मी परत आलो, पण येताना शिंदेनांही घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंगल, टवाळी केली, त्यांचा सर्वांचा मी बदला घेणार आहे. माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं असे फडणवीस म्हणाले.  

  • काही लोकांना असं वाटायचं की आम्ही सत्तेसाठी काही करतोय. पण आमचा विचार सांगतो की, सत्ता हे आमचं साध्यच नाही ते आमचं साधन आहे. सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक, आर्थिक बदल करण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे.

  • आमचं सरकार कोणत्याही बदल्याच्या भावानेनं काम करणार नाही. मागील सरकारचे जे चांगले निर्णय आहेत ते पुढे कायम करु. या संपूर्ण वाटचालीत एक सच्चा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.

  • जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा तेव्हा एखाद्या चाणाक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो आणि ही निरंकुश सत्ता खाली आणावी लागते असे म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. 

  • महाराष्ट्रात ईडीच्या मदतीन सरकार स्थापन केलं आहे. पण यामध्ये 'E' म्हणजे,  Eknath Shinde आणि 'D' म्हणजे, Devendra Fadnavis, असेही फडणवीस म्हणाले.  

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात दाखवून दिलं की आमच्यासाठी सत्ता महत्वाची नाही. आमची खंत एवढीच होती की, जनतेनं बहुमत देऊन सुद्धा ते हिरावून नेलं. म्हणून मोदींजींनी सांगितलं की सरकार बवनू आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सच्चा शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू असेही फडणवीस म्हणाले.