मुंबई : आजचा दिवस इतिहासाच्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्याच दिवशी इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी भारतात सहा राज्यांची स्थापना करण्यात झाली होती. तसेच विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता.  द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती 1956 करण्यात आली होती. कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन झाले होते. जाणून घेऊयात आजच्या इतिहासात महत्त्वांच्या घटनांबाबात...


सहा राज्यांची स्थापना


1 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक राज्यांच्या निर्मितीचा इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी मध्य प्रदेशची स्थापना झाली. जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि लोकसंख्येच्या बाबतीत सहावे मोठे राज्य आहे. 1 नोव्हेंबर 1966 रोजी भाषेच्या आधारावर हरियाणाची निर्मिती झाली. हा पूर्वी पूर्व पंजाबचा भाग होता. हरियाणा हे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचे आहे, कारण पानिपतच्या तीन लढाया पानिपतच्या मैदानात झाल्या होत्या. हरियाणातील प्रमुख शहरांमध्ये गुडगाव, फरिदाबाद, अंबाला, हिसार, रोहतक आणि सोनीपत यांचा समावेश आहे. छत्तीसगड हे भारतातील दहावे सर्वात मोठे राज्य आहे. जे मध्य प्रदेशातील काही जिल्हे मिळून 1 नोव्हेंबर 2000 रोजी स्थापन झाले. 1 नोव्हेंबर 1956 रोजी कर्नाटकची स्थापना झाली. 1950 मध्ये भारत प्रजासत्ताक बनला तेव्हा विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणार्‍या भाषांच्या आधारे अनेक राज्ये आणि प्रांत निर्माण झाले. त्याच वेळी दक्षिण भारतातील कन्नड भाषिक लोकांसाठी म्हैसूर नावाचे राज्य निर्माण झाले. परंतु अनेक प्रदेशांनी म्हैसूर हे नाव स्वीकारले नाही आणि लोकांनी राज्याचे नाव बदलण्याची मागणी केली. शेवटी 1 नोव्हेंबर 1973 रोजी त्याचे कर्नाटक असे नामकरण करण्यात आले. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली आणि या दिवशी केरळ पिरवी दिनम दरवर्षी साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर 1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला.


1918: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म


शरद तळवलकर यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. शरद तळवलकरांनी विनोदी अभिनेता म्हणून काम करत असतानाचा हेलावून टाकणारे दु :खद प्रसगांचे कामही त्यांनी केले. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी साकारली. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलिटरी अकाउंट्‌स’ मध्ये नोकरी केली. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. 


1926: शब्द प्रधान गायकी चे लेखक यशवंत देव यांचा जन्म


यशवंत देवांचा जन्म 1 नोव्हेंबर 1926 रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू होते. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला.


1932: कवी अरुण बाळकृष्ण कोलटकर यांचा जन्म


अरुण बालकृष्ण कोलटकर हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे कवी होते.कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. 1950 ते 1960 च्या दशकांत त्यांनी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या आणि गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. 


1945 : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म


नरेंद्र अच्युत दाभोळकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. 1 नोव्हेंबर 1945 रोजी त्यांचा जन्म झाला होता.  अघोरी सामाजिक प्रथा आणि अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत काम करू लागले. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना 1982 मध्ये साली श्याम मानव यांनी स्थापन केली आहे. मात्र 1989 साली नरेंद्र दाभोळकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली. ते स्वत: या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. पण नरेंद्र दाभोळकर यांची मंगळवार दि. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या ओंकारेश्वर पूलावर अज्ञातांनी 4 गोळ्या झाडून हत्या केली.


1956 :  द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेच्या मागणीने जोर धरला. त्यामुळे महाराष्ट्रातही मराठी  भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ 1946 पासून सुरु झाली होती. त्यानंतर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. पण त्यानंतर विदर्भाला बाजूला सारुन द्विभाषिक राज्य किंवा  त्रिराज्याची योजना मान्य होत नाही हे लक्षात आलं. त्यामुळे महागुजरात आणि संयुक्त महाराष्ट्र या महाद्विभाषिक राज्यांचा पर्याय पुढे आणला गेला. या गोष्टीसाठी महाराष्ट्र काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला. त्यानंतर  द्विभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर 1956 रोजी अस्तित्वात आले.या द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्रिपद काँग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाण यांनी भूषवले. 


1994: कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन


दुष्काळी महाराष्ट्राचे पाणी सल्लागार, कामगार संघटनांचे आधारस्तंभ लाल निशाण पक्षाचे राजकारण केलेले एक आमदार म्हणून ज्यांच नाव घेतलं जातं ते म्हणजे कॉम्रेड दत्ता देशमुख. त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी आमदार म्हणून जबाबदारी स्विकारली आणि विधीमंडळाता गेले.  उत्तर नगर अशा तत्कालीन अकोले, संगमनेर, बेलापूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव, राहूरी अशा आठ तालुक्यांचा असणारा एक मतदारसंघाचे नेतृत्व त्यांनी केले. त्यांच्या राजकारणी आयुष्याची सुरुवात ही काँग्रेसपक्षातून झाली होती. 1 नोव्हेंबर 1994 मध्ये त्यांचे निधन झाले.  


इतर महत्त्वाच्या घडमोडी : 


1950 : भारतातील पहिले वाफेचे इंजिन तयार करण्यात आले 
1956 : दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश बनले.
1963 : नीता अंबानी यांचा जन्मदिवस 
1973 : ऐश्वर्या राय बच्चनचा जन्मदिवस 
1870 : अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
1940 : भारताचे 35वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म