Raigad Uday Samant Accident : राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) आज दुसऱ्यांदा बोट अपघातातून बचावले आहेत. त्यांच्या बोटीला अपघात झाला तेव्हा, त्यांच्यासोबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हेदेखील बोटीत होते. आज सकाळी अलिबाग येथे येत असताना स्पीडबोटीच्या (Speed Boat) कप्तानाचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खांबांना जावून आदळली. सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना घडली नाही. या अपघाताच्या घटनेने जेट्टीवर असलेले अधिकारी, उपस्थित नागरीक चांगलेच धास्तावले होते. उदय सामंत हे दुसऱ्यांदा अपघातात बचावले आहेत. याआधी भर समुद्रात त्यांची बोट बंद पडली होती.
किल्ले रायगडावर 350 वा राज्याभिषेक सोहळा ( Shivrajyabhishek Sohala 2023 ) पार पडत आहे. त्यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा आज पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी , रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे, कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबागच्या जिल्हाधिकारी (Alibaug Collector Office) कार्यालयात घेण्यात आला. या बैठकीसाठी उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे आज सकाळी स्पीडबोटीने अलिबागला यायला निघाले होते. त्यावेळी हा अपघात (Speed boat Accident) झाला.
असा झाला अपघात
समुद्रात बोटीचा वेग कमी होता. मात्र मांडवा जेटीजवळ बोट आली असता कप्तानाने बोटीचा वेग वाढवला. मात्र, त्याचे बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट वेगाने जेटीकडे निघाली. सुदैवाने ही बोट जेटीच्या खालील भागात शिरली आणि खांबांना आदळली आणि उदय सामंत आणि संभाजीराजे अगदी थोडक्यात बचावले. गियरमध्ये बिघाड झाल्याने हा प्रकार झाल्याचे म्हटले जाते. अपघाताची घटना आमदार महेंद्र दळवी आणि त्यांचे सहकारी शिवसेनेचे कार्यकर्ते जेटीवरून पाहत होते. आम्हीदेखील या प्रकाराने घाबरलो होतो असे आमदार दळवी म्हणाले.
यापूर्वीदेखील झालाय अपघात
यापूर्वीदेखील एकदा अलिबागहून मुंबईकडे परतत असताना उदय सामंत यांना घेवून जाणारी बोट गेटवे ऑफ इंडियाजवळ समुद्रातच बंद पडली होती. बराचवेळ ती समुद्रात तरंगत होती. त्यानंतर दुसऱ्या बोटीने सामंत किनाऱ्यावर पोहोचले होते. रायगडमधील तीन आमदारांपैकी कुणाला तरी पालकमंत्री व्हायचंय म्हणूनच हे प्रकार होत असावेत असे सामंत गमतीने म्हणाले आणि एकच खसखस पिकली.