नाशिक: अनेक शहरात उद्यापासून भाजीपाला, दूध आणि दैनंदिन आवश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू शकतो. कारण उद्यापासून बळीराजा संपावर जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी संपावर जाणार असल्याचं सांगितलं.

पीक काढायचं नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचं नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसंच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला होता.

हा संप मागे घेण्यासाठी कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काल अहमदनगरमधील पुणतांबा गावात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री भेटीचा प्रस्ताव दिला.

त्यानंतर मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आता एक जूनपासून शेतकऱ्यांनी दूध आणि भाजीपाला विक्री न करण्याची भूमिका घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ 

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाटाघाटी झाल्या. मात्र चर्चेने समाधान झालं नाही. कर्जमाफीची मागणी कायम ठेवली. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, मात्र त्याने समाधान झालेलं नाही. त्यामुळे 1 जूनपासून शेतकरी संपावर जातील. गावात जाऊन त्याची तयारी करु, अशी माहिती शेतकऱ्यांनी बैठकीनंतर दिली.

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन 1 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. 3 एप्रिल रोजी घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद राज्यभरात उमटले.

संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.

  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.

  • शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा.

  • शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी.


संबंधित बातम्या : 

पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपाचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रस्तावित संपात उभी फूट, एका गटाची माघार

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडतंय: शिवसेना

एक जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जाणार!