मुंबई: शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्यांना आता थेट पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसता येणार आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.


या मंडळाकडून शाळेत शिक्षण न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी, आठवी, दहावी आणि इयत्ता १२वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी १०वी व १२वी परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनाही या मुक्त विद्यालयाचा लाभ होणार आहे.

'यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत. तसेच याचा रात्रशाळांवर कोणताही परिणाम होणार नाही.' असं शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितलं.

दरम्यान, याचवेळी आणखी एक ऐतिहासिक निर्णयही घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या खासगी शाळांमधल्या शिक्षक भरीतासाठी यापुढे परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच मेरिटनुसारच शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळं शिक्षक भरतीसाठी लाखो रुपये उकळणाऱ्या शिक्षण संस्थांना मोठा दणका बसणार आहे.

संबंधित बातम्या:

आता परीक्षेद्वारे शिक्षक भरती, तावडेंचा ऐतिहासिक निर्णय