मुंबई : भाजप (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात व्हिडिओमध्ये रावसाहेब दानवे एका कार्यकर्त्याला लाथ मारत असल्याचे दिसून येत आहे. यावरून महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता ज्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवे यांनी लाथ मारली, ते शेख हमद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर जालना विधानसभा मतदारसंघात (Jalna Assembly Constituency) महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारात भाजप सक्रिय नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी सोमवारी रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील केला. सत्कार करताना अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचे फोटो काढत काढण्यात आले. यावेळी केवळ अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा फोटो काढायचा असल्याचे एका फोटोग्राफरने सांगितले. यानंतर रावसाहेब दानवे यांनी शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला लाथ मारली होती.
काय म्हणाले शेख हमद?
आता ज्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवे यांनी लाथ मारली, ते शेख हमद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शेख हमद यांनी म्हटलं आहे की, माझा आणि रावसाहेब दानवे यांचा 30 वर्षांचा दोस्ताना आहे. दानवे यांचे शर्ट अडकल्याने त्यांच्या कानात मी सांगितले. त्यांना हे न समजल्याने व त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असल्याने त्यांनी अस मिश्किलपणे आपल्याला बाजूला सारले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच निवडणुकीच्या काळात विरोधकांना असेच निमित्त लागते, असेही शेख हमद यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारेंची टीका
दरम्यान, रावसाहेब दानवे यांचा व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका सभेत दाखवला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा वसा दिलाय. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटतं की, भाजपने तयार केलेले हे लोक अशा पद्धतीने वागवतात. 20 तारखेला मतदानाला जाताना हा व्हिडीओ लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा