लातूर : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Rain) पडला. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही भागांत वीज पडून मनुष्यहानी झाली आहे. तर, पुश-पक्षांच्या मृत्यूच्याही घटना घडल्या आहेत. नाशिक, अकोला जिल्ह्यात अवकाळी पावासामुळे शेकडो पोपट मृत्युमखी पडले आहेत. वादळी वाऱ्यामुळे झाडेही उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, स्थानिक जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. धाराशिव व लातूर (Latur) जिल्ह्यातही आज पावसाची एंट्री झाल्याचं दिसून आलं.
लातूर जिल्ह्यात शनिवार संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडून गेल्याने वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच,काही वेळापूर्वी किल्लारी आणि परिसरात तुफान पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने जनजीवन विस्कळीत झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युततारा आणि झाडे या उन्मळून पडली आहेत. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी पत्रे उडून गेल्याचीही माहिती समोर येत आहे. पाऊस एवढा तुफान होता की पावसाच्या सरींमुळे डोळ्यासमोचा माणूस दिसेनासा झाला होता. दरम्यान, अवकाळीमुळे उकाड्यापासून काही काळ दिलासाही मिळाला आहे.
लातूरसह धाराशिवच्या कळंब, उमरगा आणि भूम तालुक्यातील ग्रामीण भागातही वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पावसामुळे गेल्याने शेतकरी चिंचाग्रस्त बनले आहेत. दरम्यान, आज कोकणाबरोबरच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर या भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
100 हून अधिक पोपट मृत्यूमुखी
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे 100 हून अधिक पोपटांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक पोपट गंभीर जखमी झाले. या सर्व पोपटांचे वास्तव्य पोखरी येथील एका पिंपळाच्या झाडावर होते. या झाडावर नेहमीच पोपटांचा किलबिलाट असायचा. आता मात्र किलबिलाट पूर्ण थांबला आहे.
हेही वाचा
Unseasonal Rain : अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा, 100 पोपट दगावले, शेतीचेही मोठे नुकसान