Latur News: लातूरमधील (Latur) एका शाळेतील विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे घरी घेऊन जात असताना बस चालकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने आपलं आयुष्य गमावलं आहे.  मात्र बसमध्ये असलेल्या सर्व मुलांचं त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण केलं आहे.  रविशंकर शाळेची स्कूल बस दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जात होती. मात्र त्यावेळी वाहन चालक महावीर भोपलकर यांना याचवेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. महावीर भोपलकर यांना समजलं की आपल्याला हृदयविकाराचा झटका आहे त्यावेळी तात्काळ त्यांनी गाडी बाजूला घेतली आणि बंद केली. 


दरम्यान मुलांनाही कळालं की त्यांना काहीतरी त्रास होत आहे. तेव्हा मुलांनी मदतीसाठी आरोडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील मुलांचा आवाज ऐकून तात्काळ बसजवळ धाव घेतली. त्या लोकांनी त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. तसेच बसमधील विद्यार्थ्यांनी आजूबाजूला कोणी डॉक्टर मिळतो याची देखील पाहणी केली. त्यानंतर विद्यार्थ्यी धावत पळत जाऊन एका डॉक्टरला घेऊन देखील आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात देखील दाखल करुन घेतले. परंतु तोपर्यंत त्यांनी त्यांचा जीव गमावला होता. 


चालक महावीर यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिथेच त्यांना मृत घोषित केले. या संपूर्ण घटनेची माहिती शाळेला देण्यात आली. त्यानंतर शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर त्या सर्वांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. महावीर यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे 25 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. पंरतु महावीर यांच्या जाण्याने मात्र सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


'आमच्या शाळेच्या बसमध्ये 25 विद्यार्थी होते. बस रुद्रेश्वर मंदिराच्या भागात आल्यानंतर महावीर भोपलकर यांना त्रास व्हायला सुरुवात झाली त्यामुळे त्यांनी बस तात्काळ बाजूला घेतली. त्यांना लगेच मदत देखील मिळाली परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असं म्हणत शाळेतील बस अटेंडंट आशा येलगटे यांनी हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान त्याचवेळी  या परिसरातून रविंद्र भालेकर हे परिमल शाळेचे शिक्षक जात होते. तेव्हा त्यांना काहीतरी विपरीत घडल्याचं लक्षात आलं. त्यांनी याबाबत बोलतांना म्हटलं की, "माझ्या लक्षात आलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे मी त्यांना सीपीआर देण्याचा  प्रयत्न केला.. बस मधील मुलांनी आणि आजुबाजूच्या लोकांनी डॉक्टरांना बोलून आणलं. डॉक्टर आले  त्यांना तपासलं तोपर्यंत महावीर यांचा मृत्यू झाला होता. " 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Latur News : लातूर विभागात पशुरोग निदान प्रयोगशाळेचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; काय असतील फायदे?