Sambhaji Patil Nilangekar on Dhiraj Deshmukh : तीन वेळेस उद्घाटन आणि रशियाला विकलेल्या रेल्वे कोच कारखान्याचे मोदी लोकार्पण करणार, अशी टीका आमदार धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी केली होती. त्याचे पडसाद आता उमटत असून आज मराठवाडा कोच फॅक्टरीच्या लोकार्पण समारंभात संभाजी पाटील-निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी आमदार धीरज देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 


आज मराठवाडा कोच फॅक्टरी लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यावर काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी टीका केली होती. आजच्या उद्घाटन सोहळ्यात आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. 


घोडा मैदान लांब नाही


संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, घोडा मैदान लांब नाही. निवडणुका सुरू होतील. यात सगळे हिशोब केले जातील. बॅटिंग तर करायची होतीच. आता सुरुवातच तुम्ही केली आहे. तयार रहा, असा इशारा देत संभाजी पाटील निलंगेकर यांनी रणशिंग फुंकले आहे. या भागात कारखाना होतोय आणि देशमुख परिवारातलं कोणी त्यात नाही याच दुःख देशमुखांना आहे. त्यामुळे ते असं खोटं बोलत आहेत. या सगळ्या गोष्टींचा हिशोब निवडणुकीच्या काळात होईलच असेही त्यांनी म्हटले आहे. 


काय म्हणाले होते धीरज देशमुख?


लातूर येथे उभारण्यात आलेल्या मराठवाडा रेल्वे कारखान्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे. पण या कारखान्याचे चौथ्या वेळेस उद्घाटन होत आहे. हा कारखाना रशियाला विकला असल्याचा आरोप आमदार धीरज देशमुख यांनी केला. तालुक्यातील खरोळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 


कर्मचाऱ्यांना राबवून या महाशयांनी रशियाला पैसे दिले


गेल्या चार वर्षांपासून रेल्वे फॅक्टरीच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात कुणाच्याच हाताला काम मिळालेले नाही. फॅक्टरीसाठी विदेशातून पैसे आणणार, असे म्हणाले होते. पण येथे आपल्या कर्मचाऱ्यांना राबवून या महाशयांनी रशियाला पैसे दिले आहेत. त्यामुळे जनतेने जागृत होणे गरजेचे असल्याचेही देशमुख यांनी म्हटले होते. 


देशमुख-निलंगेकर पुन्हा वाद 


लातूरच्या राजकारणात देशमुख-निलंगेकर पाटील यांच्यातील सत्ता संघर्ष तसा जुनाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत असतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून याची सुरुवात झाल्याची प्रचिती येत आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आता हिशोबला तयार राहा, असा इशारा दिल्याने आता देशमुख-निलंगेकर संघर्ष पुन्हा पेटणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.