लातूर : निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्तता मिळाल्याचा दिवस म्हणजे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन. मराठवाडा भागाला मराठवाडा हे नाव ज्या बावणे सरदाराच्या गढीत मिळाले तीच तांदूळजाची गढी रझाकार काळात चळवळीचे केंद्र बनली होती. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापर्यंत या गढीच्या साक्षीने अनेक घटना घडामोडी घडल्या आहेत.  


लातूर जिल्ह्यातील तांदूळजा आणि बीड जिल्ह्यातील गिरवली गावात छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून नाईक बावणे घराण्यांचे वर्चस्व होते. नाईक बावणे हे कर्तबगार घराणे सिंदखेडच्या लखुजीराजे जाधवांच्या काळापासून मराठी दौलतीत सेवा देत आले आहेत. मराठवाड्यातील गिरवली आणि तांदुळजा ही सरदार नाईक बावणेंची इनाम गावे. छत्रपती शाहू महाराजांनी घोडदळात काम करणाऱ्या नाईक बावणे घराण्यातील सरदार जाणोजीराव यांना या गावाची देशमुखी देऊन गौरव केला होता. त्यानंतर हे नाईक बावणे यांनी या भागातील चौथाई वसूल करण्याचं काम केलं. 


निजाम काळातील लढाई आणि विजयश्री
निजामाबरोबर मराठ्यांचं कायमच शत्रुत्व होतं. पश्चिम महाराष्ट्र आणि निजामाचा मुलुख यामधील भागवर बावणे सरदार यांची इनामी गाव होते. निजामाच्या सैनिकांनी एकदा तांदूळजाच्या गढीवर हल्ला केला होता. यावेळी गढीच्या बाजूला असणाऱ्या शेतामध्ये तुल्यबळ युद्ध झाले होते. यात निजामाच्या अनेक सैनिकांचे शीर धडा वेगळे करण्यात आले होते. शीर नसलेल्या अनेक लोकांचे ढित तिथे रचण्यात आले होते. त्यामुळे त्या भागाला शीरखंडीचं रान म्हणतात. 


निजामाशी तह आणि मराठवाडा नामकरण 
 निजाम आणि मराठे यांच्यात अनेक युद्ध झाली, राक्षसभूवन येथेही एक लढाई झाली होती. यात निजामाचा सेनापती विठ्ठल सुंदर मारला गेला.  निजामाचा दारुण पराभव झाला होता. या लढाईनंतर जो तह झाला तो तांदूळजाच्या नाईक बावणे यांच्या गढीतच झाला. निजामाने त्याच्या भागातील ज्या मुलखाची चौथाई देण्याचा हक्क दिला, त्या भागाला मराठवाडा असं नाव देण्यात आलं.  इथेच मराठवाडा या नावाची उत्पत्ती झाली. पेशवाईचा अंत होईपर्यंत तांदूळजाचे नाईक बावणे सरदार कार्यरत होते. 


रझाकारांना विरोध
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.  मात्र निजामी राजवटीच्या अमलाखाली असलेला मुलुख पारतंत्र्यात पार भरडून जात होता. रझाकारांच्या टोळ्या गावावर धाड घालत होत्या.  माणसे मारणे, संपत्ती लुबाडणे, स्त्रियांवर अत्याचार करणे हे नित्याचं झालं होतं. अशा काळात तांदूळजा मधील याच गढीतून रझाकाराच्या विरोधात संघर्षाची ठिणगी पेटली. तांदूळजा आणि आजूबाजूच्या गावातील तरुणांची फौज तयार करण्यात आली. महिला अबालवृद्धांना गढीत आश्रय देण्यात आला. गावातील बंशीलाल मारवाडी यांच्या मुलाचा खून करून चाळीस रझाकारांनी संपत्ती लुटली होती. त्या चाळीस रझाकारना मांजरा नदीच्या पात्रात बुडवून मारण्यात आलं. त्या मोहिमेचं नेतृत्व याच गढीतून झालं होतं. अनेक हल्ले गढीवर झाले, परंतु ते परतवण्यात आले. याच ठिकाणी अनेकांनी आश्रय घेत त्या कठीण काळात स्वतःचे प्राण वाचवले होते. 


उद्या होणार ध्वजारोहण 
छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापर्यंत अनेक घटनेची साक्षीदार असलेल्या या गढीवर उद्या सकाळी ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती  लातूरचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांनी दिली आहे. ध्वजारोहणाचा मान तांदूळजाच्या सरपंच विनिता शिवाजीराव नाईक बावणे यांना मिळाला आहे.


महत्वाच्या बातम्या


Bahirji Shinde : मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्यवीर बहिर्जी शिंदेंच्या कुटुंबाची दयनीय अवस्था, पडक्या घरात राहण्याची वेळ