Maratha Reservation : लातूर (Latur) जिल्ह्यात दिवसें दिवस मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय तीव्र होताना दिसत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची तिरडी अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. आज शैक्षणिक बंदचेही आव्हान करण्यात आले होते. मागील तीन दिवसापासून लातूरमधील तरुण आमरण उपोषणालाही बसले आहेत.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यभर वातावरण पेटलेले आहे. लातूरमध्येही आंदोलनाची आणि संतापची लाट दर दिवशी तीव्र होताना दिसत आहे. आज सकल मराठा समाजाच्या वतीनं लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आमदार खासदारांची, तिरडी अंत्ययात्रा काढण्यात आली होती. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अचानक काढलेल्या या अंत्ययात्रेमुळं पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ अंत्ययात्रा आणि तेथील सामान ताब्यात घेतले आहे.


आज लातूरमध्ये शैक्षणिक बंद


संपूर्ण राज्यात लातूर हे शैक्षणिक शहर म्हणून ओळखलं जातं. सकल मराठा समाजाच्यावतीनं लातूर जिल्ह्यात आज शैक्षणिक बंद पाळण्यात यावा असे आवाहन  करण्यात आले होते. या आवाहनास शैक्षणिक संस्थांनी, शाळांनी उत्तम सहकार्य करत पाठिंबा दिला आहे. लातूर शहरातील सर्व शैक्षणिक संस्था आज बंद होत्या.


तीन दिवसापासून आमरण उपोषणही सुरुच...


जालना येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा म्हणून लातूर येथेही आमरण उपोषण करण्यात येत आहे. मागील तीन दिवसापासून लातूर येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे. आदित्य देशमुख या तरुणास उपोषण स्थळी भेटण्यासाठी जिल्हाभरातून समाजबांधव येत आहेत.


वलांडी ते भालकी रस्त्यावर रास्ता रोको....


आरक्षणाचा विषय घेऊनच जिल्ह्यात कुठे ना कुठे रोज रास्ता रोको आणि गाव बंदच आयोजन करण्यात येत आहे. आज वलांडी येथे गाव बंद ठेवण्यात आले होते. तसेच वलांडी ते भालकी या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. भालकी वलांडी हा कर्नाटक आणि महाराष्ट्रला जोडणारा अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्यावर तब्बल दोन तास रास्ता रोको करण्यात आला होता.


जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली येथे मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. त्यांचं आमरण उपोषण सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये आंदोलकांसह पोलिसही जखमी झाले. दगडफेक झाली. या लाठीचार्जच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली तर काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली.


महत्त्वाच्या बातम्या:


Raj Thackeray : जालना घटनेत पोलीस नव्हे, त्यांना आदेश देणारे दोषी; राज ठाकरेंचे थेट राज्य सरकारवरच ताशेरे