लातूर : भाजी बाजारात टोमॅटोची आवक वाढलेली आहे. यामुळे बाजारभावामध्ये मोठी पडझड झालेली पाहावयास मिळत आहे. एक महिन्यापूर्वी 200 रुपये किलो असलेल्या टोमॅटो आज चक्क दोन रुपये किलो विकला गेला आहे. टमाट्याच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा असणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टमाट्याची लागवड केली जाते. लातूर जिल्ह्यातून टोमॅटो हा तेलंगणा आणि हैदराबाद सारख्या भागांमध्ये विक्रीसाठी पाठवला जातो. लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ, चाकूर, चापोली, या भागामध्ये तसेच लातूर ग्रामीण मधील भागांमध्ये टमाट्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते. या भागातील शेतकऱ्यांना भाव पडल्यामुळे मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.
जयपाल जाधव या शेतकऱ्याची वडवळ नागनाथ येथे यांची दोन एकर टमाट्याची शेती आहे. त्यांनी पिकासाठी एकरी दीड लाख रुपये खर्च झाला आहे. तीन लाख रुपये लागवड खर्च आहे काढणीचा खर्च वेगळा आहे. काढण्याचा खर्च सुद्धा आता परवडणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. वडवळ जानवळ चापोली चाकूर यासारख्या गावात या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टमाट्याची शेती केली जाते. या भागातून देशातील सर्वच ठिकाणी त्यात हैदराबाद, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, श्रीलंका यासारख्या भागात टोमॅटो पाठवले जात असतात. टमाट्याचे दर पडल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
लातूर ग्रामीण येथील वांगदरी या गावातील फुंदे बंधू यांची 20 एकर शेती आहे. यात अडीच एकरवर त्यांनी तीन ते साडे तीन लाख खर्च करून टमाट्याची लागवड केली होती. आज टोमॅटो काढणीला सुद्धा ही परवडत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. घरच्या जनावरांना टोमॅटो खाऊ घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे
मार्केटमध्ये भाव नसताना मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या टोमॅट्याचे काय करावे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
लाखो रुपये खर्चून टोमॅटोचे पीक (Tomato Crop) घेतले असून, सध्याच्या भावात मजुरी सुटणे अवघड असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. मधल्या काळात टोमॅटोमुळे शेतकरी लखपती झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसारित झाल्या होत्या, आता कमी दरामुळे लाखो रुपयांचे भांडवल खर्च झालेल्या टोमॅटो शेतकऱ्यांना रोडपती बनविण्याचा धोका असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.