Latur News: लातूर येथील पर्वत रोही अजय बालाजी गायकवाड यांनी आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर किलिमंजारोवर (Mount Kilimanjaro) चढून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अजय गायकवाड यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी 75 फूट तिरंगा 16 हजार फूट उंचीवर फडकवून इतिहास रचला आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्वात उंच शिखर असलेल्या या पर्वतावर हा तिरंगा फडकवत अजय गायकवाडने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे अजय गायकवाड यांनी लातूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे 


आफ्रिका खंडातील किलिमंजारो शिखर सर करणे तसे अत्यंत जिगरीचं आणि अवघड काम समजले जाते. शिखर पार करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागत असतो. मात्र हे अवघड आव्हान अजय  गायकवाड यांनी यशस्वीरित्या पेलले होतं. चार दिवस तीन रात्र सातत्याने खडतर आव्हानांचा सामना करत अजय गायकवाड यांनी हे शिखर सर केला आहे. शिखरावर पोहोचल्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले. शिवाजी महाराजांच्या नावाचा गजर करण्यात आला. त्यानंतर 75 फुट लांब राष्ट्रध्वज येथे फडकवण्यात आला.


गावकऱ्यांची आर्थिक मदत मिळाली...


किलिमंजारो शिखर सर करण्यासाठी अजय गायकवाड यांची 360 Explorer या आंतरराष्ट्रीय असोसिएशनच्या अंतर्गत भारतीय गिर्यारोहकांच्या संघात निवड करण्यात आली होती. अजय गायकवाड यांची निवड झाल्यानंतर तिथे जाणे आणि एकूण खर्च खूप जास्त होता. अजय गायकवाड यांचा भाऊ, कुटुंबीय आणि चाकुर तालुक्यातील सुगाव येथील गावकरी यांनी त्यास आर्थिक मदत केली होती. अधिक रकमेची गरज असल्यामुळे अजय यांच्या समोर प्रश्न निर्माण झाला होता. त्यास लातूर शहरातील अनेक लोकांनीही मदतीचा हात पुढे केल्याने अजयची ही यात्रा सफल झाली. 


माउंट किलिमंजारोवर फडकला 75 फुटांचा तिरंगा 


यावेळी बोलतांना अजय गायकवाड म्हणाले की, दोन भारतीय मित्रांच्या मदतीने मी किलिमंजारो शिखर सर केला आहे. त्यांनी मदत केल्याने जगातील सात खंडापैकी आफ्रिका खंडातील आंतरराष्ट्रीय पातळीचा माउंट किलिमंजारो येथे 75 फुटांचा ध्वज फडकवून मी स्वातंत्र्य दिन साजरा केला. याचा मला सार्थ अभिमान आहे. यासाठी मला माझ्या गावकऱ्यांनी प्रचंड मदत केली. आई-वडिलांसह गावकऱ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्यानेच मी इथपर्यंत पोहचलो, असल्याचं अजय गायकवाड म्हणाले. 


पहिल्याच दिवशी हार मानली होती...


किलिमंजारो शिखर सर करण्याची अजय यांची अनेक दिवसांचं स्वप्न होते. स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना मार्ग मिळाला तो 360 Explorer या आंतरराष्ट्रीय असोसिएशनचं.  भारतीय गिर्यारोहकांच्या संघात त्यांची 360 Explorer या आंतरराष्ट्रीय असोसिएशनच्या अंतर्गत निवड झाली. मात्र त्यासाठी सुद्धा काही पैसे लागणारच होते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने पहिल्याच दिवशी गायकवाड यांनी हार मानली होती. मात्र गावकऱ्यांनी आणि लातूरकरांनी त्यांना आर्थिक मदत केली. या मदतीचं अजय यांनी सुद्धा सोनं करून दाखवत अखेर किलिमंजारो शिखर सर करूनच माघार घेतली.