Latur Farmers Agitation : राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाची शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील शेती पिकांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. तसेच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी छावा संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी छावा संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं. लातूर जहीराबाद महामार्गावर मसलगा इथे बैलगाडी आडवी लावत हे आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते.
 
लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट ओढावलं आहे. त्यांच्या हातातील पिकं वाया गेली आहेत. दुसरीकडे सोयाबीन पिकावर गोगलगायीचे संकट आले आहे. त्यातच निलंगा तालुक्यातील मसलगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील रस्ते विकासाच्या कामात भूसंपादनात जमिनी गेलेल्या लोकांना अद्यापही मोबदला  मिळालेला नाही. रस्त्यांची कामे अर्धवट आहेत. या सर्व विषयाला वाचा फोडण्यासठी छावा संघटनेकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज या भागातील शेतकरी नागरिकांनी छावा संघटनेच्या बरोबरीने रास्ता रोको आंदोलन केलं. या रास्तारा रोकोमुळं लातूर-जहीराबाद हा रस्ता बराच काळ बंद होता. यामुळं दुतर्फा वाहनांची मोठी कोंडी झाली होती.


गोगलगायीमुळं सोयाबीनचे मोठं नुकसान, शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत द्या
 
वेळोवेळी अर्ज, विनंत्या करुनही मागण्या मान्य होत नसल्याने छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर बैलगाड्या आडव्या लावत रस्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान, निलंगा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता. ओला दुष्काळ जाहीर करावा, गोगलगायीच्या त्रासामुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये तत्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे. लातूर जहीराबाद रस्त्याच्या विकास कामात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्यांना तत्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 


निलंगा, औसा, उदगीर तालुक्यात मोठं नुकसान


लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. निलंगा आणि औसा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळं शेताचे रुपांतर शेततळ्यात झाले आहे. त्यामुळं पिकं वाहून गेली आहेत. कमी कालावधीमध्ये झालेल्या तुफान पावसाने शेतातील पिकं वाहून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगिर तालुक्यातही जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी जमीनी खरडून गेल्या आहेत. अंतर्गत रस्त्यावरील छोटे मोठे पूल देखील पाण्या खाली गेले आहेत. दळणवळण करणं शक्य नसल्यामुळं अनेक अडचणी निर्माण होत आहेत. 


महत्वाच्या बातम्या: