Maharashtra Karnataka Border Dispute : सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटलेला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील गाव कर्नाटकात जाण्यास इच्छुक असल्याचं समोर आलं आहे. लातूर जिल्ह्यातील बोंबळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून ग्रामस्थ उमेदवारी अर्ज मागे घेणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटकात सामील होण्याचा इशारा लातूरमधील बोंबळी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळत नसून भेदभाव केला जात असल्याचा आरोप बोंबळी ग्रामस्थांनी केला आहे.
एकीकडे सीमाभागातील मराठी भाषिक गावे कर्नाटकातून महाराष्ट्रात येण्यास इच्छुक असताना देवणी तालुक्यातील बोंबळीच्या गावकऱ्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या, अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकून आम्ही कर्नाटकात सामील होऊ, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीदर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील मराठी भाषिक गावे वर्षानुवर्षे महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत राहिली आहेत. आजही त्या गावांचा व्यवहार महाराष्ट्रात अधिक आहे. दरम्यान, महाराष्ट्र-बेळगाव सीमाप्रश्न पेटल्यानंतर नवनवीन मुद्दे समोर येत आहेत. अजूनही मराठी भाषिक गावांची महाराष्ट्राशी जोडून राहण्याची इच्छा आहे. परंतु, देवणी तालुक्यातील बोंबळी येथील ग्रामस्थांना स्वतंत्र ग्रामपंचायत मिळालेली नाही. शासकीय योजनांसाठी भेदभाव केला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. याउलट कर्नाटक सरकार शेतकरी आणि गरीब जनतेसाठी चांगल्या योजना राबवीत आहे, असे सांगत ग्रामस्थांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत प्रशासनाकडे निवेदन दिले असून, त्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, शाळेची उत्तम व्यवस्था करा, कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळालं, त्या पार्श्वभूमीवर आम्हालाही अनुदान उपलब्ध करून द्या. स्थानिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करा, शेतीसाठी 10 एचपीपर्यंत मोफत वीज द्या, अशी मागणी बोंबळी ग्रामस्थांनी केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद आणखी चिघळला आहे. बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर महाराष्टातील नेत्यांनीही प्रत्युत्तर देत हल्ला चढवला. बोम्मई यांनी म्हटलं होतं की, सीमेवरील गावांना मूलभूत सुविधा देत सीमेवरील गावं कर्नाटकात सामील करून घेऊ. त्यानंतर त्यांच्या या वक्त्यावर अनेक प्रतिकिया उमटल्या. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर तणाव वाढल्याचे पाहायला मिळालं. दोन्ही भागात निदर्शनं करण्यात आली. काही काळासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक यामधील बससेवाही बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान, कर्नाटकमधील काही मराठी भाषिक ग्रामस्थांची इच्छा महाराष्ट्रात सामील होण्याची आहे. याउलट महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांना कर्नाटकात सामील व्हायचं आहे.