Latur News : विसर्जनाचा शेवटचा मान असलेले दक्षिणेश्वर औसा हनुमान संस्कृतिक गणेश मंडळने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चक्रीभजनाचे आयोजन केले होते. यावेळी नाथ संप्रदायाचे औसा येथील मठाचे पाचवे पिठाधीपती गुरूबाबा औसेकर महाराज यांच्यासह 50 पेक्षा जास्त वारकऱ्यांनी चक्रीभजन सादर केले. औसा येथील मठाचा 242 वर्षांचा इतिहास आहे. पायात चाळ, गळ्यात विणा आणि हातात चिपळ्या घेऊन डिमडीच्या साथीने गोल फिरत चक्रीभजन सादर केले जाते. या भजनात विठुरायाच्या नामात देहभान हरपून नृत्य केले जाते.


चक्रीभजनाचा इतिहास


पंढरपूर येथे 242 वर्षांपासून चक्रीभजनाची परंपरा औसेकर घराण्याकडून केली जाते. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये माघ शुद्ध तिसऱ्या दिवशी औसेकर घराण्यातून 242 वर्षांपासून भव्य दिव्य अशी चक्री भजनाची परंपरा आहे. माघ शुद्ध महिन्यामध्ये औसेकर घराण्याकडून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्रीभजन केले जाते.


हेच चक्रीभजन लातूर शहरातील 50 पेक्षा जास्त वर्षांपासून विसर्जनाचा शेवटचा मान असलेल्या दक्षिणेश्वर औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळात सादर करण्यात आले. गणेश उत्सवाचे पावित्र्य प्रत्येक गणेश भक्तांनी जपलं पाहिजे. समाजामध्ये आजही अनेक गरीब लोक आहेत. ज्यांना अंगभर कपडे नाहीत, पायामध्ये चप्पल नाही. अशा विपणनावस्थेत लोक जगतायत. अशा दीन दुबळ्यांची सेवा गणेश मंडळाच्या माध्यमातून केली गेली. तरच तो खऱ्या अर्थाने देवाची आराधना केल्यासारखा आहे. असे मत गुरुबाबा औसेकर महाराज यांनी व्यक्त केले. 


चक्रीभजन ह्याच गणेश मंडळात का?


चक्रीभजनाचा आनंद आणि तो ही गणेशोत्सवामध्ये असे कधी होत नाही. मात्र, ही संधी दक्षिणेश्वर औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाच्या माध्यमातून लातूरकरांना मिळाली. याच कारणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लातूरकरांनी चक्रीभजनाचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावली. चक्रीभजन झाल्यानंतर गुरुबाबा औसेकर महाराजांचे प्रवचन झाले. दक्षिणेश्वर औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाचे काम उत्तम स्वरूपाचे आहे. या गणेश मंडळात गुलालाची उधळण होत नाही. डीजे लावला जात नाही. पैशांची वारेमाप उधळपट्टी केली जात नाही. इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून उत्सव मूर्ती ही फायबरची आहे. अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात. विसर्जनाचा शेवटचा मान असल्यामुळे गणपतीचे विसर्जन होत असताना सर्वप्रथम विसर्जन मार्गावरील रस्ते स्वच्छ केले जातात. याच कारणामुळे इतर कोणत्याही गणेश मंडळापेक्षा औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ कायमच वेगळा आहे.